#IPL2019 : अखेरच्या सामन्यात बंगळुरूने हैदराबादला रोखले

बंगळुरू – शिमरॉन हेटमायर आणि गुरकीरत सिंग यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायजर्स हैदराबादवर 4 विकेटस्‌ने विजय मिळविला. या पराभवामुळे हैदराबादचा प्ले ऑफमधील प्रवेश अनिश्‍चित झाला आहे.

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 7 बाद 175 धावा केल्या. प्रत्युत्तरात बंगळुरूने 19.2 षटकांत 6 बाद 178 धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूची सुरुवात निराशाजनक राहिली. सलामीवीर पार्थिव पटेल (0), विराट कोहली (16) आणि एबी डिव्हिलिअर्स (1) हे झटपट बाद झाले.

त्यानंतर शिमरॉन हेटमायर (75)आणि गुरकीरत सिंग (65) यांनी चौथ्या विकेटसाठी 89 चेंडूत 144 धावांची निर्णायक भागीदारी करत संघाला विजयासमीप नेले. त्यानंतर उमेश यादव याने चौकार ठोकत संघाच्या विजयावर शिक्‍कामोतर्ब केला.

तत्पूर्वी, हैदराबादच्या निर्णायक सुरुवातीनंतर मधल्या फळीतील फलंदाजी ढेपाळली. सलामीवीर वृद्धिमान साहा आणि मार्टिन गुप्टिल यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. सामन्यातील दुसऱ्याच षटकात 2 चौकार आणि 1 षटकार खेचत तब्बल 19 धावा वसूल केल्या.

त्यानंतर वृद्धिमान साहाचा अडसर नवदीप सैनी याने चौथ्या षटकात दूर केला. साहाने 11 चेंडूत 4 चौकार ठोकत 20 धावांची खेळी केली. त्यानंतर हैदराबादच्या फलंदाजांनी बंगळुरूच्या गोलंदाजीपुढे शरणगती पत्करली. दुसऱ्या बाजूने कर्णधार केन विल्यम्सन याने बंगळुरूच्या गोलंदाजीचा समाचार घेत 43 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार खेचत नाबाद 70 धावांची खेळी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.