- पाण्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न ः 14 मैलाशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित
पिंपरी – महापालिकेच्या वतीने 14 मैलाशुद्धीकरण केंद्रांतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. या प्रक्रिया केलेल्या पाण्यापैकी 23 दशलक्ष लिटर पाण्याचा फेरवापर केला जातो. महापालिकेच्या सर्व मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी महापालिकेने सुपर प्लॅन केला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेची स्वतःची सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी केंद्र आहेत. महापालिका हद्दीतील सांडपाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करण्यासाठी सद्यस्थितीत नऊ ठिकाणी 353 दशलक्ष लिटर प्रतिदिनी क्षमतेची 14 मैलाशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित आहेत. शहरामध्ये 1566 किलोमीटर मलःनिसारण नलिका टाकण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत मैलाशुद्धीकरण केंद्रात येणाऱ्या सुमारे 270 ते 275 दशलक्ष लिटर प्रतिदिन सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. या मैलाशुद्धीकरण केंद्रावर स्काडा प्रणालीद्वारे देखरेख ठेवली जाते. स्मार्ट सिटीअंतगर्त ही स्काडा प्रणाली विकसित करण्याचे प्रस्तावित आहे.
मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर केला जातो. कासारवाडी टप्पा एकच्या मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले पाच एमएलडी पाणी मिलिटरी डेअरी फार्ममध्ये शेतीसाठी वापरले जाते. तर टप्पा तीनच्या केंद्रातील दहा एमएलडी पाणी सीएमई येथील रोईंग चॅनलसाठी वापरले जाते. चिखली टप्पा एक आणि दोनमधील केंद्रातील तीन एमएलडी पाणी संभाजीनगर, शाहूनगर, भागातील उद्याने, सोसायटींसाठी वापरण्यात येते.
वायसीएम रुग्णालयातील 0.65 एमएलडी पाणी रुग्णवाहिका धुणे आणि बगीच्यासाठी वापरले जाते. तसेच कासारवाडी, चिंचवड, आणि आकुर्डी केंद्रातील पाच एमएलडी पाणी उद्यानासाठी वापरण्यात येते. मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करण्याच्या दृष्टीने सुपर प्लॅन तयार करण्यात आला आहे
कार्यान्वित मैलाशुद्धीकरण केंद्रे
रावेत (20), आकुर्डी (30), चिंचवड (टप्पा 1-30, टप्पा 2-30), चिखली ( टप्पा 1 – 16, टप्पा 2 – 16) , कासारवाडी (टप्पा 1 -40, टप्पा 2 – 40, टप्पा 3 – 40) दापोडी 20, सागंवी 10, पिंपळे निलख 20, चऱ्होली टप्पा 1 – 20, टप्पा 2 – 21 अशा एकूण 353 दशलक्ष लिटर क्षमतेच्या 14 मैलाशुद्धीकरण केंद्रांचा समावेश आहे.