- गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी ः भोसरीतून एकाला अटक
पिंपरी – विक्रीसाठी आणलेला नऊ लाख 37 हजार रुपये किंमतीचा 37 किलो गांजा पोलिसांनी पकडला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. लांडगेवस्ती, भोसरी येथे शनिवारी ही कारवाई करण्यात आली.
दत्ता पुरूषोत्तम कल्याणी (वय 25, रा. लांडगेवस्ती, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे कर्मचारी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी नितीन खेसे यांना शिवशक्ती कॉलनी, भोसरी येथे एकजण झाडाच्या कडेला एकजण दोन पोत्यांसह संशयितरित्या उभा असलेला दिसून आला. यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्यांच्याकडील दोन पोत्यांमध्ये 37 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजा असल्याचे दिसून आले.
या गांजांची किंमत नऊ लाख 37 हजार 710 रुपये इतकी आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याने हा गांजा विक्रीसाठी आणला असल्याची कबुली पोलिसांना दिली.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक उपनिरीक्षक रवींद्र गावंडे, कर्मचारी आनंद बनसोडे, अमित गायकवाड, मनोजकुमार कमले, मारूती जायभाये, अंजनराव सोडगिर, नितीन खेसे, गणेश सावंत, विशाल भोईर तसेच अंमली पदार्थ विरोधी पथकातील सहायक उपनिरीक्षक राजन महाडिक, राजेंद्र बांबळे, अजित कुटे आणि प्रसाद कलाटे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.