पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने शैक्षणिक भूखंड 99 वर्षाच्या भाडेपट्ट्याने देत 9 कोटी 12 लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. पुणे येथील डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स यांना चिखली, पेठ क्रमांक 18 येथील शैक्षणिक संकुलाचा भूखंड 99 वर्षाच्या भाडेपट्ट्याने (लीझ डीड) देण्यात आला आहे, अशी माहिती उप-मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली.
प्राधिकरणाचे चिखली, मोशी, रावेत, भोसरी, वाकड येथील एकूण 14 शैक्षणिक भूखंड 99 वर्षाच्या भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यातील पेठ क्रमांक 40 आणि पेठ क्रमांक 4 येथील भूखंडांसाठी प्रत्येकी 3 निविदा आल्या. मात्र, अपुऱ्या कागदपत्रांमुळे या निविदा अपात्र ठरल्या. पर्यायाने, पेठ क्रमांक 18 येथील शैक्षणिक संकुलाच्या भूखंडाचे “लीझ डीड’ झाले आहे. त्याशिवाय, उर्वरित 11 भूखंडांसाठी तीनपेक्षा कमी निविदा आल्या.
त्यामुळे त्यामध्ये स्पर्धा होत नसल्याने या निविदाच उघडल्या नाही. पर्यायाने, “लीझ डीड’ न होऊ शकलेल्या भूखंडांबाबत पुन्हा फेरनिविदा मागविल्या जाणार आहेत. पेठ क्रमांक 18 येथील शैक्षणिक संकुलाच्या भूखंडासाठी प्राधिकरणाने 7.32 कोटी रुपयांचे अधिमूल्य निश्चित केले होते. या भूखंडासाठी 7 शैक्षणिक संस्थांचे प्रस्ताव आले होते.
त्यातील 3 शैक्षणिक संस्थांनी सादर केलेली कागदपत्रे अपूर्ण होती. त्यामुळे त्यांचे प्रस्ताव बाद झाले. उर्वरित 4 शैक्षणिक संस्थांमध्ये पुणे येथील डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स यांनी दिलेले दर सर्वाधिक होते. त्यामुळे त्यांची निविदा मान्य करण्यात आली. त्यातून प्राधिकरणाला 9 कोटी 12 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.