पिंपरी – चिंचवडच्या चापेकर चौकातून पोलीस आयुक्तालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात भंगाराचे साहित्य ठेवण्यात येत आहे. याबाबत लोकप्रतिनिधींदेखील अनेकदा तक्रार करूनही महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून काहीच कारवाई होत नाही.
वेताळनगर ही चापेकर चौकातील झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीतील काही नागरिकांनी आपल्या झोपड्या भंगार विक्रेत्यांना भाड्याने दिल्या आहेत. मात्र झोपडीची जागा अपुरी असल्याने येथील भंगारवाले रस्त्यावरच आपले साहित्य ठेवतात. चापेकर चौकातून पोलीस आयुक्तालयाकडे हा मार्ग जातो. त्यामुळे हा पोलीस आयुक्तालयाचा रस्ता आहे की भंगाराचे गोदाम, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. याच मार्गावर एका व्यापाऱ्याने हातगाड्या भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. रात्रीच्यावेळी या सर्व हातागड्या रस्त्यालगत असलेल्या भिंतीला उभ्या करून ठेवण्यात येतात.
यामुळेही आणखी रस्ता व्यापला जात आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने वाहतूक आणि चिंचवड पोलिसांच्या सहकार्याने येथील फेरीवाल्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती. मात्र अतिक्रमण पथकाची पाठ फिरताच पुन्हा येथील चौकात अतिक्रमण झाले.
अतिक्रमण विरोधी पथकाने फक्त येथील फेरीवाल्यांवरच कारवाई केली. मात्र भंगार साहित्याने रस्ता अडविणाऱ्या भंगारवाल्यांना अभय दिल्याचे दिसून येत आहे.रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, असे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वाहतूक पोलिसांना दिले. मात्र अद्याप पर्यंत एकही गुन्हा दाखल झाला नसल्याचे दिसून येत आहे.