देहूगाव -देहू नगरपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांपैकी अनुसूचित जाती महिला आरक्षित जागेच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी (दि. 7) दुपारी दोनपर्यंत तीन जणांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. सायंकाळी छाननीनंतर तिन्ही अर्ज वैध आहेत, अशी माहिती मुख्य अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी माहिती दिली आहे.
देहू नवनिर्मित नगरपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या प्रथम निवडणुकीतील अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यामध्ये अध्यक्षपदाच्या जाहीर झालेल्या अनुसूचित जाती महिला आरक्षित पदासाठी सोमवारी (दि. 7) नामनिर्देशन दाखल करण्यात आले होते. प्रभाग क्र. 9 मधील स्मिता शैलेश चव्हाण यांचे 2 अर्ज, तर प्रभाग क्र. 3 मधील पूजा अमोल दिवटे यांनी एक अर्ज अध्यक्ष पदासाठी दाखल केले आहेत. छाननीनंतर तीनही अर्ज वैध झाले आहेत.
नगराध्यक्षांच्या निवडीनंतर
उपनगराध्यक्ष निवड
शुक्रवारी (दि. 11) सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत मुख्याधिकारी यांच्याकडे नामनिर्देशन पत्र सादर करणे. पिठासीन अधिकारी यांनी अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर उपाध्यक्षपदाचे नामनिर्देशन पत्राची छाननी करणे. छाननीनंतर 15 मिनिटे माघारीसाठी देण्यात आली आहेत. उमेदवारी अर्ज माघारीनंतर लगेचच निवडणूक घेण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निवडणूक घेण्याची सूचना व विशेष सभेचे नोटीस जाहीर केले आहे.