पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाजवळील दीड एकर जागा बर्न वाॅर्डसाठी देण्याचा प्रस्ताव रुग्णालय प्रशासनाने महापालिका प्रशासनासमोर ठेवला आहे. बेघरांसाठीचे आरक्षण बदलल्यास हा पर्याय होऊ शकतो. तशी माहिती रुग्णालय प्रशासनाने महापालिकेसमोर ठेवला आहे. त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. हा निर्णय झाल्यास संबंधीत रुग्णांची मोठ्या प्रमाणात होणारी गैरसोय टळणार आहे.
तळवडे येथील फटाक्याच्या कंपनीत स्फोट झाल्याने तब्बल १४ कामगारांना आपला जीव गमाविण्याची घटना घडली. जखमी कामगारांना उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविण्याची वेळ महापालिकेवर आली. या दरम्यान शहरात बर्न वाॅर्ड निर्माण करण्याची गरज असल्याच्या चर्चांना पुन्हा उजाळा मिळाला. त्यासाठी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात हा वाॅर्ड तयार करण्याची मागणी जोर धरू लागली. मात्र सध्या रुग्णालयात अपुरी जागा असल्याने हा वाॅर्ड होत नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. लहान मुलांचा वाॅर्ड, स्त्री प्रसूती शास्त्र वाॅर्डमध्ये येणाऱ्या रुग्णांनाच जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे बर्न वाॅर्डसाठी इतर जागेचा विचार होऊ लागला.
त्यानुसार रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयाशेजारी असलेल्या दीड एकर जागेचा पर्याय सुचविला आहे. सध्या त्या जागेवर बेघरांसाठीचे आरक्षण आहे. हे आरक्षण बदलून इतर ठिकाणी द्यावे. त्या दीड एकर जागेवर सुपरस्पेशालिटी विभाग करता येर्इल अशी सूचना रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. त्यावर महापालिका प्रशासन कोणता निर्णय घेणार हे आता पहावे लागणार आहे.
जागा मिळाल्यास या सुविधा मिळणार
शहरात बर्न वाॅर्ड नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. वर्षभरात ११६ रुग्णांना बर्न वाॅर्ड अभावी ससून रुग्णालयात पाठविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे दीड एकर जागा मिळाल्यास त्या ठिकाणी विविध सुविधांनी युक्त विभाग करता येर्इल असा प्रस्ताव ठेवण्यात आला आला आहे. ही जागा ताब्यात आल्यास त्या ठिकाणी बर्न वार्ड, लहान मुलांच्या वरील शस्त्रकि्रया, न्युरो सर्जन आदी सुपर स्पेशल शस्त्रकि्रया करता येणार आहेत.
सध्या बर्न वाॅर्डसाठी रुग्णालयात जागा उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णालयाशेजारी असणाऱ्या दीड एकर जागेचा आम्ही पर्याय सुचविला आहे. त्याचा या पुर्वी देखील विचार झाला होता. दीड एकर जागा मिळाल्यास बर्न वार्ड, लहान मुलांच्या वरील शस्त्रकि्रया, न्युरो सर्जन आदी विभाग सुरू करता येतील.
– डाॅ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, पीजी महाविद्यालय, वायसीएम.