Nepal : नेपाळमधील प्रचंड सरकारची सोमवारी संसदेत परीक्षा….

काठमांडू :- नेपाळमधील सत्तारुढ आघाडीचे पंतप्रधान पुष्पकमल दहाल प्रचंड यांना उद्या (सोमवारी) संसदेत विश्वास दर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. प्रतिनिधी गृहामध्ये हा विश्वासदर्शक ठराव आपण जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आघाडीमधून घटक पक्ष बाहेर पडल्यामुळे प्रचंड यांना विश्वास दर्शक ठरावाला सामोरे जावे लागते आहे.
प्रचंड हे नेपाळमधील माओवादी बंडखोरांचे माजी नेते आहेत आणि संसदेतील तिसऱ्या क्रमांकाच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (माओवादी सेंटर) पक्षाचे अध्यक्ष आहेत. देशाचे पंतप्रधान बनल्यापासून गेल्या १८ महिन्यात प्रचंड यांना चौथ्यांदा विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागते आहे. यापूर्वी १३ मार्चला पंतप्रधान प्रचंड यांनी तिसऱ्यांदा विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. त्यापूर्वी माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सीपीएन-यूएमएलने आपला पाठिंबा काढून घेतल्यानंतर गेल्या वर्षी प्रचंड यांना बहुमत चाचणीचा सामना करावा लागला होता.
सध्या गृहमंत्री राबी लामिछाने यांच्याकडून सहकारी निधीचे गैरवितरण झाल्याच्या आरोपांची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी विरोधी नेपाळी कॉंग्रेसने संसदेचे कामकाज रोखून धरले आहे.
सत्ताधारी आघाडी आणि विरोधी पक्षांमधील मतभेद चर्चेतून सोडवले जातील आणि सरकार बहुमत चाचणीमध्ये टिकेल यात शंका नाही, असे पंतप्रधान प्रचंड म्हणाले.
जनता समाजवादी पक्षाने गेल्या आठवड्यात आघाडी सरकारमधून बाहेर पडन सरकारचा पाठिंबा काढून घेतला. नवीन सरकारला विश्वासाचे मत जिंकण्यासाठी २७५ सदस्यांच्या प्रतिनिधीगृहात किमान १३८ मतांची आवश्यकता आहे.





