पुणे – जी.एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग आणि मॅनेजमेंटच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना मका कणसाचे आवरण सोलण्याच्या यंत्राचे (कॉर्न पीलिंग मशीन) पेटंट भारतीय पेटंट विभागाकडून मिळाले आहे.
या यंत्रासाठी कॅम्पस संचालक डॉ. आर. डी. खराडकर, सहयोगी प्राध्यापक डॉ. अरुण ठाकरे आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे विद्यार्थी धीरज शहा, पांडुरंग पवार, निलेश पवार आणि छाया बडे यांनी कार्य केले आहे. या यंत्राची अभिनव रचना, उपयुक्तता आणि त्याचा मका पिंकावरील प्रक्रिया यामुळे मका कणसाचे आवरण सुरक्षितरित्या काढता येणार आहे.
मका बियांचे नुकसान टाळता येणार आहे. विद्यार्थी धीरज शहा, पांडुरंग पवार, निलेश पवार आणि छाया बडे ज्यांनी डिझाइननुसार प्रोटोटाइप विकसित करण्यासाठी खूप योगदान दिले ते देखील पेटंटधारक आहेत. रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष सुनील रायसोनी, कार्यकारी संचालक श्रेयश रायसोनी यांनी पेटंट मिळाल्याबद्दल शोधकर्त्यांचे कौतुक केले.
…असे आहे यंत्र
मका कणीस सोलून त्यातील बिया वेगळे करण्याची प्रक्रिसा अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. एका मका कणसाचे आवरण सोलण्यासाठी फक्त १० ते १५ सेकंद लागतात आणि प्रति मिनिटाला २ किलो मका कणीस आवरण सोलण्याची क्षमता या यंत्रामध्ये आहे. या यंत्राच्या रोलर्ससाठी अल्ट्रा हाय मॉलिक्युलर वेटेड पॉलिथिलीन मटेरिअलचा वापर करण्यात आला आहे. साइड रोलर्सवर चौकोनी आकाराच्या दातांसह मशीन कॉर्न बियांचे नुकसान टाळते, कार्यक्षमता वाढविण्यासाठी विचारशील आणि धोरणात्मक डिझाइन करण्यात आली आहे.