वॉशिंग्टन – अमेरिकेने या आठवड्याच्या सुरुवातीला नेवाडा येथे सबक्रिटिकल अणुचाचणी घेतली. यूएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जीच्या नॅशनल न्यूक्लियर सिक्युरिटी ऍडमिनिस्ट्रेशनने पिरसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहीती देण्यात आली आहे.
अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या कारकिर्दीतील ही तिसरी अणु चाचणी होती. मंगळवारी देशाच्या आण्विक शस्त्रास्त्रांसंबंधी आवश्यक डेटा गोळा करण्यासाठी ही चाचणी केली गेली, असे नॅशनल न्युक्लिअर सिक्युरीटी ऍडमिनिस्ट्रेशनने म्हटले आहे.
निंबल सिरीज मधील ही पहिलीच चाचणी होती. लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरीच्या भागीदारीत सबक्रिटिकल एक्सपेरिमेंटेशन सुविधेसाठी प्रिन्सिपल अंडरग्राउंड लॅबोरेटरी येथे ही चाचणी केली गेली.
अण्वस्त्रांची सुरक्षितता आणि परिणामकारकतेसाठी ही चाचणी आवश्यक होती, असे यूएस एनर्जी डिपार्टमेंटची शाखा असलेल्या नॅशनल न्युक्लिअर सिक्युरीटी ऍडमिनिस्ट्रेशन अर्थात एनएनएसएने म्हटले आहे.आण्विक स्फोट न घडवून आणता ही चाचणी केली गेली होती.
अमेरिका सरकारने १९९२ मध्ये आण्विक स्फोटांच्या चाचण्यांवर स्थगिती जाहीर केली होती. मात्र त्यानंतर सत्तेवर आलेल्या सरकारांनी अशा प्रकारच्या सबक्रिटीकल चाचण्या सुरूच ठेवल्या आहेत. सर्वात शेवटची सबक्रिटीकल अणु चाचणी सप्टेंबर २०२१ मध्ये घेण्यात आली होती.
“हा प्रयोग आणि सर्व ३३ यूएस सबक्रिटिकल अणू चाचण्या सर्वसमावेशक अणु चाचणी बंदी कराराच्या शून्य-उत्पन्न मानकांशी सुसंगत होत्या, असे एनएनएसएने एका निवेदनात म्हटले आहे.
पुन्हा पुन्हा चाचण्या घेण्याची योजना…
आम्ही या सबक्रिटीकल अणु चाचण्यांची वारंवारता वाढवण्याचा विचार करत आहोत. जेणेकरून भूमिगत अणू स्फोट चाचण्या करण्याची आवश्यकता नसल्यामुळे अण्वस्त्रांबाबतचा महत्वाचा डाटा प्राप्त करणे शक्य होणार आहे, असे संरक्षण कार्यक्रमांचे उप संचालक मार्विन ऍडम्स यांनी एका निवेदनात म्हटले आहे.