पिंपरी – शहरात दिवसेंदिवस मोकाट जनावरांची संख्या वाढत असल्यामुळे गोशाळा असणे गरजेचे झाले आहे. यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून चिखली येथील सुमारे 5 एकर जागेत गो संवर्धन केंद्र आणि गोशाळा सुरू करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.
भोसरी विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामांबाबत महापालिका भवनात आमदार महेश लांडगे यांनी बैठक घेतली. यावेळी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त-1 प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त- 2 विजय खोराटे, मुख्य शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शहराचा विस्तार वाढत असल्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्या गायी, बैल आदी गोवंशाची संख्या सुमारे 700 च्या आसपास आहे. अनेकदा दूध न देणाऱ्या गायी अर्थात भाकड गायी शेतकऱ्यांकडून सोडून दिल्या जातात. असे गोवंश शहरातील रस्त्यांवर पहायला मिळतात. जखमी झाल्यामुळे किंवा आजारी असल्यामुळे संबंधित गोवंशाला उपचाराची आवश्यकता असते. अनेकदा उपचाराअभावी गायींचा मृत्यूही झाल्याची उदाहरणे आहेत. मोकाट जनावरे रस्त्याच्या मध्यभागी बसून असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि लहान-मोठे अपघाताच्या घटनाही वारंवार घडल्या आहेत. तसेच, वयोवृद्ध झालेल्या गाईंची देखभाल करण्याचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून गोशाळा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यासाठी गोशाळा आणि गो संर्वधन व उपचार केंद्र सुरू केल्यास गोवंश वृद्धीच्या दृष्टीने हितकारक ठरणार आहे.
रस्ता नसल्याने गो शाळा प्रलंबित
चिखली, पाटीलनगर येथील इंद्रायणी नदीच्या शेजारी महापालिकेची 5 एकर जागा आहे. या जागेकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने गो शाळेचा प्रश्न प्रलंबित आहे. जागेसाठी पशू वैद्यकीय विभागाने नगररचना विभागाला पत्र देऊन जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. आता या प्रश्नी आमदार महेश लांडगे यांनी आयुक्तांबरोबर बैठक घेतल्याने रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
प्रस्तावित गोशाळेसाठी चिखली येथील 5 एकर जागा उपलब्ध करण्याबाबत प्रशासन सकारात्मक आहे. त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या जागेकरिता 18 मीटर रस्ता नियोजित आहे. त्याचे भूसंपादन आणि तांत्रिक कार्यवाही करण्याबाबत प्रशासनाला सूचना केली आहे. गोवंश हा आपली संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे गोसंवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे.
– महेश लांडगे, आमदार