पिंपरी, दि. 25 (प्रतिनिधी) – चिंचवड येथील सहदुय्यम निबंधक कर्यालय हवेली क्रमांक 5 येथे संपर्कासाठी कोणतीच सुविधा नाही. तसेच पार्किंगचीही व्यवस्था अपुरी आहे. त्यामुळे येथे आल्यावरच कामाकाज व कार्यक्षेत्राविषयीची माहिती मिळते. त्यात अनेकांचा वेळ आणि पैसाही वाया जातो. कोटींचे महसूल असलेल्या या कार्यालयात सुविधांची मात्र, वानवा आहे. येथे संपर्कासाठी दूरध्वनीच्या सुविधेसह इतर पुरेशा सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.
चिंचवड येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयाला दरमहा कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. येथील कार्यालयात दररोज सरासरी 30 ते 40 दस्तांची नोंदणी होते. त्याद्वारे कार्यालयाला दरमहा सुमारे 20 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. त्या तुलनेत सुविधांची मात्र, वानवा आहे. नागरिकांना बसण्यासाठी वेटिंग रुम (प्रतीक्षालय) आहे. मात्र, बसण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने नागरिक कार्यालयाबाहेर ताटकळत उभे असलेले पाहण्यास मिळतात. दररोज दस्त नोंदणी आणि संबंधित इतर कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या तुलनेत बसण्यासाठी जागा अपुरी आहे. चिंचवडला महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी एकच स्वच्छतागृह आहे. येथे महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी एकच स्वच्छतागृह आहे. स्वच्छतागृहांची संख्या वाढवायला हवी.
चारचाकीसाठी पार्किंगच नाही
या कार्यालयाच्या बाहेर पार्किंगची अपुरी सुविधा आहे. येथे दुचाकी पार्किंगसाठी अपुरी जागा आहे. काहीजण रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात. चारचाकी वाहनांना तर पार्किंगच नाही. त्यामुळे चारचाकी वाहने घेऊन येणारे रस्त्यावरच वाहने उभी करतात.
दूरध्वनीची गरज
येथे नागरिकांना कामकाजासाठी आल्यावर तेथील माहिती मिळते. तेथे आल्यावर सर्व माहिती मिळते. येथे संपर्कासाठी कोणतीच सुविधा नाही. त्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष येथे यावे लागते. त्यात वेळ आणि पैसे वाया जातात. तसेच येथील अधिकारी, कर्मचारी यांचा मोबाइल क्रमांक हा वैयक्तिक असल्याने कामासाठी येणाऱ्यांना ते देत नाहीत. आम्ही आहोतच येथे काही काम असेल, तर या, असे सांगतात. प्रत्येकाला वारंवार चकरा मारणे शक्य नाही. आजच्या या अधुनिक काळातही येथे संपर्काची सुविधा नाही. त्यामुळे येथे किमान एका दूरध्वनी क्रमांकाची गरज असल्याचे कामासाठी येणाऱ्यांचे म्हणणे आहे.
कार्यालयातील कामकाज
दस्त नोंदणी
दस्ताच्या सुचिची प्रमाणित
नक्कल करणे
दस्तची प्रमाणित नक्कल देणे
शोध उपलब्ध करणे
जुना मूळ दस्त नोंदणी पूर्ण
करून परत देणे
मुद्रांक शुल्क भरण्याच्या प्रयोजनार्थ मूल्यांकन अहवाल देणे