पिंपरी – महाराष्ट्र राज्य मागास आयोगामार्फत सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या कामात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील १ हजार ३०० शिक्षकांवर ही जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्याध्यापक वगळता इतर सर्व कायमस्वरूपी शिक्षकांना अतिरिक्त काम दिले आहे. त्यामुळे मानधनावरील शिक्षकांवर विद्यार्थ्यांना शिकविण्याची वेळ आली आहे. शिक्षकच सर्वेक्षणाच्या कामावर गेले, तर अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र राज्य मागास आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य शासनाने सर्वेक्षण करण्याचे आदेश जारी केले आहेत, या अनुषंगाने सर्वेक्षणाला सुरुवात झाली. सर्वेक्षणाच्या कामात शिक्षकांना जुंपण्यात आले आहे. शिक्षकांना विविध अशैक्षणिक कामात गुंतविले जात असल्याची टीका होत आहे. शिक्षक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. या सर्वेक्षणादरम्यान 125 ते 150 प्रश्नांची माहिती भरावी लागत आहे. 31 जानेवारीनंतर संकलित माहिती मागासवर्ग आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड केली जाणार आहे.
शिक्षकांना या कामात गुंतविल्यामुळे शहरातील अनेक शाळा ओस पडल्याचे चित्र आहे. शाळेतील अध्यापनाच्या कामाची गती मंदावली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १०८ प्राथमिक आणि १८ माध्यमिक शाळांमधील तब्बल १ हजार ३०० कायमस्वरूपी शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम दिले आहे. तर या दोन्ही विभागात सध्या मानधनारील शिक्षक शिकवण्याचे कामे करत आहेत. ५०० मानधनावरील शिक्षकांवर ही जबाबदारी देण्यात आली आहे. मानधनावरील शिक्षकांची अपुरी संख्या असल्याने अनेक शाळांमध्ये शिकविण्यासाठी शिक्षकच मिळत नसल्याचे चित्र आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण होणार कसे, असा प्रश्न पालक उपस्थित करीत आहेत.
अभ्यासक्रम पूर्ण करण्याची चिंता
वेळोवेळी शिक्षकांवर अशैक्षणिक कामे थोपविली जात असल्याचा आरोप शिक्षक संघटना करत आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सध्या शाळांमध्ये स्नेहसंमेलन सुरू आहेत. येत्या दिवसांत वार्षिक परीक्षा होणार आहेत. त्यामुळे अभ्यासक्रमही पूर्ण करण्याची चिंता शिक्षकांना आहे. सर्वेक्षणाचे काम दिल्याने अध्यापनाचे काम रखडत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक वगळता इतर सर्व कायमस्वरूपी शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम दिले आहे. सध्या १३०० शिक्षक हे काम करत आहेत. त्यामुळे दोन्ही विभागासाठी नेमलेले मानधनावरील शिक्षक अभ्यासक्रम शिकवित आहेत.
– विजय थोरात, सहाय्यक आय़ुक्त, माध्यमिक शिक्षण विभाग.