Vijay Vadettivar | Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. एकही उमेदवार नसताना मनसे प्रचारात सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी सभा घेतली होती.
त्यांनतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. 10) पुण्यामध्ये भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. या सभेत त्यांनी हिंदू मुस्लिम मुद्द्याचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार टीका केली.
राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर उत्तर देताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील राज ठाकरेंवर गंभीर आरोप केले. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला.
ते म्हणाले की, “राज ठाकरे हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या यादीत योग्य आहेत. महाराष्ट्राची जनता हे जाणून आहे. त्यांना दिल्लीमध्ये बोलावून फाईल दाखवून सांगितले की प्रचार आमचाच करावा लागेल. म्हणून मजबुरीने त्यांना भाजपचा प्रचार करावा लागत आहे.
दुसरीकडे मोदींना पहिल्या टप्प्यातील मतदानानंतरच पराभव दिसायला लागला आणि त्यांनी दुसऱ्या टप्प्यातील भाषणात मंगळसूत्रचा विषय आणला. तेही चालेले नाही तर म्हैस आणली. दोन म्हशी असतील तर एक म्हैस काँग्रेस काढून येईल, असे भाषणातून सांगू लागले.
देशाचे पंतप्रधान एखाद्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सभापतींसारखे बोलत आहेत. यामुळे देशाची मान शरमेने खाली गेली आहे. आता पुन्हा त्यांची भाषा बदलली आहे.
त्यांच्या भाषणात पाकिस्तान, मुसलमान, असे मुद्दे आले. तसेच राम मंदिरही आले. पण जनतेने या जुमलेबाज सरकारला सत्तेबाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.