पुणे – लक्ष्मीपूजनानिमित्त शनिवारी मंडई परिसरात पूजा साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली. लक्ष्मीपूजनासाठी मंडई परिसरातील हुतात्मा बाबू गेनू चौक परिसरात फुले खरेदीसाठी शनिवारी (दि.11) सकाळपासून गर्दी झाली होती. त्यामुळे व्यापारी बांधवांत आनंदाचे वातावरण दिसून आले.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक फूल बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. मंडई परिसरात लाह्या, बत्तासे, ऊस तसेच लक्ष्मी (केरसुणी) विक्रेत्यांनी तात्पुरत्या स्वरुपात दुकाने थाटली होती. व्यापारी वर्गाकडून लक्ष्मीपूजनानिमित्त कीर्द, खतावण्यांचे पूजन करण्यात येते. प्रथेप्रमाणे बोहरी आळीतील व्यापाऱ्यांकडून कीर्द, खतावण्यांची खरेदी व्यापारी वर्गाकडून खरेदी करण्यात आली. मंडई परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.
“ग्राहकांकडून हळदी-कुंकू, खारीक, खोबरे, सुपारी, अगरबत्ती, धुप, वाती, तेल, रांगोळी, अष्टगंध, विविध प्रकारची फुले, विड्याची पाने, खडीसाखर, केळीचे खुंट, तुळशीची पाने, दुर्वा आदी प्रकारच्या साहित्याला मागणी आहे. साधारणपणे 10 टक्के भाववाढ नोंदवली गेली आहे.”- राधिका इनामदार, व्यापारी