नादुरुस्त, जळालेले मीटर देखील मिळेना : सर्वाधिक महाग वीज विकणाऱ्या महावितरणची दुरवस्था
नवीन गृहप्रकल्पांना देण्यासाठीही महावितरणकडे मीटरचा साठा नाही
पिंपरी – महावितरणचा महसूल ज्या वीज मीटरवर अवलंबून आहे, त्यांचाच तुटवडा असल्याची परिस्थिती उद्भवली आहे.त्यामुळे शहरात आज हजारो वीज जोडण्यो प्रलंबित आहेत. याशिवाय नादुरुस्त आणि जळालेले मीटर बदलून मिळावेत म्हणून ग्राहकांच्या नशिबी खेट्या मारणे आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक महाग वीज विकणाऱ्या महावितरणच्या दुरवस्थेवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून,राज्य सरकारने कायमस्वरूपी काहीतरी योजना आखून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.
आठ महिन्यांच्या लॉकडाऊननंतर पिंपरी-चिंचवड शहरातील बांधकाम व्यवसाय हळुहळू पूर्वपदावर येऊ लागला आहे. शहरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या बांधकाम प्रकल्पांमध्ये शेकडो सदनिका आणि घरे विकसित होत आहेत. तिर जिल्हाभरात ठिकठिकाणी औद्योगिक प्रकल्प व व्यवसाय नव्याने उभे राहत आहेत. या सर्व सदनिकांना नवीन वीज जोडण्या देण्याची गरज आहे. त्यासाठी महावितरणकडे नवीन वीजजोड ग्राहकांना मागणीनुसार वीज मीटर द्यायला पुरेसा मीटरचा साठा उपलब्ध नाही.
तसेच हा साठा नेमका केव्हा उपलब्ध होऊ शकतो, याचीही कुठलीही शाश्वती द्यायला अधिकारी तयार नाहीत. महावितरणच्या एका- एका शाखा कार्यालयात शेकडो ते हजारो नादुरुस्त आणि जळालेले मीटर बदलणे प्रलंबित आहेत. याचा भुर्दंड ग्राहकाला सोसावा लागत आहे.वीज मीटरचा साठा ठेवू न शकणे याहून मोठा फोलपणा काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
करोना काळात सर्वाधिक चर्चेत महावितरणने ग्राहकांच्या माथी मारलेल्या वीज बिलांची चर्चा आहे. ही चर्चा संपते ना संपते तोच आता वीज मीटरचा साठा नसल्याने ग्राहक आणि नवीन अर्जदार यांच्या समस्येत मोठी भर पडली आहे. खासगी यंत्रणा वाटेल तो व्यवसाय नफ्यात आणतात पण हजारो करोड रुपयांचे उत्पन्न असलेल्या महावितरणला नफ्यात तर सोडाच सोडा साधे आवश्यक असलेले विज मीटर ठेवता येऊ नये, हे हास्यास्पद आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.
मोठी अडचण
काही दिवसांपुर्वी महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी वीजमीटरबाबत तक्रारी आल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांची इकडे आड तिकडे विहिर अशी अवस्था झाली आहे.
अधिकारी मान्य करण्यास तयार नाहीत
एकीकडे नागरिक त्रस्त होत असताना दुसरीकडे मात्र महावितरणचे अधिकारी मात्र मीटर नसल्याचे मान्य करण्यास देखील तयार नाहीत. याबाबत महावितरणचे पिंपरी विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळखर यांच्याशी संपर्क साधला असता, महावितरणकडे वीज मीटरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे वीज मीटरची कोणतीही समस्या भेडसावत नसल्याचे त्यांनी सांगितले. तर याबाबत मुख्य अभियंत्यांशी चर्चा न होऊ शकल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.