आंदोलनात शेतकरी नसेल तर त्यांच्याशी चर्चा का करता ?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांचा केंद्र सरकारला सवाल

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या तीन नव्या कृषी कायदांविरोधात दिल्लीच्या वेशीवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाच्या समर्थनार्थ विरोधी पक्षाने भारत बंदही पाळला होता. या बंदला विविध राज्यात वेगवेगळ्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला. सत्ताधारी पक्षातील नेते मात्र या शेतकरी आंदोलनात राजकीय शक्तींचा हात असल्याचा आरोप सातत्याने करताना दिसत आहेत. असे आरोप करणाऱ्या मंत्र्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी सरकारला गोंधळात पाडणारा प्रश्न विचारला.

“सत्ताधारी मंत्र्यांनी शेती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना खलिस्तानी, पाकिस्तान आणि चीनचे एजंट, नक्षलवादी म्हटलं आहे. हल्ली तर त्यांचा उल्लेख हे मंत्री तुकडे तुकडे गँगमधील सदस्य असाही करताना दिसत आहेत. जर तुम्ही असे आरोप करत आहात तर याचा अर्थ या हजारो आंदोलनकर्त्यांमध्ये एकही शेतकरी नाही. जर या आंदोलनात एकही शेतकरी नाही, तर सरकार या आंदोलनकर्त्यांशी चर्चा का करत आहे?”, असा कोंडीत पकडणारा प्रश्न माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी सत्ताधारी नेत्यांना विचारला.

याच मुद्द्यावरून समाजवादी पक्षाचे प्रवक्ते यांनीही सरकारवर बोचरी टीका केली. “देशातील शेतकरी वर्ग रास्त मागण्यांसाठी दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत गेल्या अनेक दिवसांपासून अविरत आंदोलन करत आहे. पण सरकारला मात्र हे आंदोलन दडपायचे आहे. ज्यांच्यामध्ये नथुराम गोडसे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा DNA आहे, त्याच लोकांना (नेत्यांना) या शेतकऱ्यांमध्ये नक्षलवादी आणि देशद्रोही दिसतात. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आम्ही गावोगावी फिरून कायद्याविरोधात निषेध नोंदवणार आहोत. आंदोलन दडपण्यासाठी ठोकशाहीचा वापर करण्यात आला तरी आम्ही एकही पाऊल मागे हटणार नाही”, असा निर्धार समाजवादी पक्षाचे प्रवक्ते सुनिल सिंग साजन यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांचे आंदोलन हे आक्रमक होताना दिसत आहे. आज देशाच्या अन्नदात्यानेच उपोषण करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार आज सकाळपासूनच शेतकऱ्यांचे उपोषण सुरु झाले आहे. शेतकऱ्यांच्या सोबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेदेखील उपोषण करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.