पिंपरी – ज्या रस्त्यावरुन मोटारी धावायला हव्यात त्या रस्त्यावरच मोटारी विक्रीसाठी ठेऊन रस्ता वाहतुकीसाठी अरुंद केला होता. महापालिकेने आता अशा व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील रस्ते, पदपथ अतिक्रमणांने व्यापले जात आहेत. शहरातील बहुताशी फुटपाथवर अतिक्रमणे वाढल्यामुळे महापालिकेने आता कारवाई करण्यासाठी पालिकेने कडक पाऊले उचलली आहेत. त्यानुसार शुक्रवारी (दि.6) ड क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात रस्ते आणि पदपथावर विक्रीसाठी ठेवलेल्या चार व्यावसायिकांच्या 13 मोटारी महापालिकेने जप्त केल्या आहेत. त्यामुळे व्यावसायिकाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
नवीन वाहनांच्या सातत्याने किंमती वाढत असल्याने नागरिकांचा जुनी वाहने खरेदी करण्याकडे काही प्रमाणात कल आहे. त्यानुसार शहराच्या विविध भागात जुनी वाहने विक्री करण्याचा मोठा व्यवसाय चालतो. मात्र, हे व्यावसायिक वाहने विक्रीसाठी ठेवताना रस्ते व पदपथावर अतिक्रमण करून उभी करतात. त्यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना याचा त्रास होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पदपथावर विक्रीसाठी ठेवलेल्या जगताप डेअरी येथून ओम मोटर्सच्या 2, मानकर चौकातून मोर्या कार्सच्या 4, वाकडकर वस्ती येथून निधीवन मोटर्सच्या 4 तर वाकड चौकातून जी एस मोटर्सच्या 3 अशा 13 मोटारी महापालिकेने जप्त केल्या आहेत. या अतिक्रमण कारवाईसाठी 2 पोलीस कर्मचारी, एमएसएफचे सुरक्षा रक्षक, अतिक्रमण कर्मचारी आणि दोन टोइंग व्हॅनसह कारवाई करण्यात आली.
याबाबत ड क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक अरूण सोनकुसरे म्हणाले, ड क्षेत्रीय कार्यालय परिसरात पदपथावर व्यावसायिकांनी वाहने अथवा अतिक्रमण करू नये. अन्यथा कारवाई करण्यात येईल. यापुढेही पदपथावर वाहने उभी केल्यास ती जप्त केली जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.