लोणावळा : कॉंग्रेस-राष्ट्रवादीचं जमलं; आघाडी धर्म पाळण्याचा पक्षश्रेष्ठींच्या कार्यकर्त्यांच्या सूचना

लोणावळा – 2014 मध्ये मतांचे विभाजन झाले म्हणून भाजप सत्तेत आला. हे मतविभाजन टाळण्यासाठी संपूर्ण देशातून 21 समविचारी पक्ष एकत्र आलेत आणि त्यात राष्ट्रवादीचा समावेश आहे. त्यातच केंद्रात आता जे सरकार आहे ते जातीयवादी सरकार आहे. या सरकारला खाली खेचने गरजेचे आहे. आणि त्यासाठी आवश्‍यक असणारी 272 जागांची “मॅजिक फिगर’ गाठण्यासाठी लोकसभेची एकएक जागा महत्वाची आहे. त्यामुळे निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळून मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीला साथ देऊन आघाडीचे काम मनापासून करा अशा सूचना लोणावळा येथे संपन्न झालेल्या कॉंग्रेस मेळाव्यादरम्यान कॉंग्रेस नेते हर्षवर्धन पाटील आणि जिल्हाध्यक्ष संजय जगतात यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना केल्या.

लोकसभा निवडणूक प्रचारात सक्रिय होण्यापूर्वी इंदापूर, भोर, पुरंदर आणि मावळ या विधानसभाच्या जागांबाबत राष्ट्रवादीने आपली भूमिका प्रथम स्पष्ट करावी, अशा भूमिकेत कॉंग्रेसचे कार्यकर्ते असल्याने तसेच जोपर्यंत जिल्हा कॉंग्रेस आदेश देत नाहीत, तोपर्यंत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्रचारात न उतरण्याचे धोरण मावळ तालुक्‍यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी स्वीकारले होते. त्यामुळे लोणावळा शहरात आयोजित करण्यात आलेल्या कॉंग्रेस मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

या मेळाव्याला कॉंग्रेस नेते हर्षवर्धन पाटील, जिल्हाध्यक्ष संजय जगताप, माजी खासदार अशोक मोहोळ, माजी आमदार दिलीप ढमढेरे, जिल्हा समन्वयक रामभाऊ बराटे, युवक जिल्हाध्यक्ष सोमनाथ दौंडकर, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे यांच्यासह पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक आणि पक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकर्त्यांनी तक्रारींचा पाढा वाचला

मावळ विधानसभेतील कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची रविवारी लोणावळा येथे मेळावा झाला. या मेळाव्यात जिल्ह्यातील विविध विधानसभेच्या मतदासंघाबाबत चर्चा झाली. या चर्चेत विधानसभा निवडणुकीची दिशा ठरविण्याच्या सूचना अनेकांनी मांडल्या. विशेष म्हणजे या वेळी अनेकांनी पक्ष नेत्यांपुढे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तक्रारींचा पाढा वाचला.

मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधात आक्रमक मुद्दे मांडणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांची समजूत काढताना हर्षवर्धन पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेचा थोडक्‍यात घोषवारा कार्यकर्त्यांच्या पुढे मांडला. तसेच आघाडीचा धर्म कॉंग्रेस पाळले, पण विधानसभेसाठी खडकवासला, इंदापूर, पुरंदर, भोर, मावळ, खेड, जुन्नर या जागांसाठी कॉंग्रेस आग्रही असणार असल्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांना ठणकावून सांगितल्याचे माहिती पाटील यांनी उपस्थितांना दिली.

“मग एकदा आमचंही सीट पडुद्या..’

लोणावळा येथील मेळाव्यामध्ये बोलताना माजी खासदार अशोक मोहळ यांनी गरजवंताला अक्‍कल नसते असे सांगत राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीला मदत करणे ही आपली गरज बनली असल्याचे प्रतिपादन केले. तर कॉंग्रेसचे जिल्हा समन्वयक रामभाऊ बराटे यांनी मेळाव्या दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत मावळ आणि खडकवासला मतदार संघ कॉंग्रेसला सोडण्यात यावेत. याठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला नेहमीच हार खावी लागली आहे, मग एकदा आमचंही सीट पडुद्या अशी मिश्‍किल मागणी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.