जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पाच वर्षे सक्तमजुरी 

पुणे – अतिक्रमण करून जागेत टाकलेले पत्र्याचे शेड काढण्यास सांगितल्याचा राग मनात धरून जागामालक आणि मित्रावर चाकुने वार करून, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पाच वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुधाकर सोनवणे यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त दोन महिने कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.
सुरेश विश्‍वनाथ कदम असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत राजेंद्र शंकरराव शिंदे (वय 52, रा. पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. घटनेत फिर्यादी आणि त्यांचे मित्र अशोक दादू घोडेस्वार (वय 50, रा. पिंपरी) हे जखमी झाले होते. ही घटना 19 ऑक्‍टोबर 2015 रोजी घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील एन.डी.पाटील (धायगावे) यांनी 8 आणि अतिरिक्त सरकारी वकील मच्छिंद्र गटे यांनी 3 साक्षीदार तपासले.
घटनेच्या आधी सहा महिने सुरेश हा फिर्यादी राहत असलेल्या परिसरात राहण्यास गेला. त्याने फिर्यादींच्या जागेत पत्र्याचे शेड बांधले होते. ते फिर्यदींनी त्यास काढायला सांगितले. त्यावेळी फिर्यादींशी हुज्जत घालून त्याने ते शेड काढले. त्यावेळी “बघून घेईन’ अशी धमकी त्याने फिर्यादींना दिली होती. घटनेच्या दिवशी फिर्यादी मित्र घोडेस्वार यांच्यासह ऑफीसमध्ये बसले होते. त्यावेळी दुपारी 12 च्या सुमारास सुरेश त्यांच्या ऑफिसमध्ये गेला. दरवाजाला आतून कडी लावून घेतली. त्याने घोडेस्वार यांच्या हातावर आणि अंगावर चाकुने वार केला. ते गंभीर जखमी झाल्यानंतर, फिर्यादींच्या डाव्या हातावर वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी आरडा-ओरड केली. हे पाहून सुरेश पळाला. त्यानंतर फिर्यादीच्या मुलाने तेथे येत दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणात पिंपरी पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यावर सुनावणी करत न्यायालयाने शिक्षा सुनावली. बचाव पक्षातर्फे ऍड. बी.ए.आलुर यांनी काम पाहिले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.