वरुथिनी एकादशीनिमित्त माऊली मंदिरात भाविकांची गर्दी

आळंदी – वरुथिनी एकादशीनिमित्त मंगळवारी माऊली मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केल्याचे चित्र होते.  इंद्रायणी नदीवर भर उन्हाळ्यातही खळखळते पाणी असल्यामुळे भाविकांनी पवित्र अशा इंद्रायणी नदीतच पहाटेचे स्नान करणे पसंत केले.

माऊली मंदिरात आज पहाटे पासूनच नित्याचे धार्मिक कार्यक्रम व सायंकाळी भजन, कीर्तन, प्रवचन, दुपारी श्रींना महानैवेद्य, भाविकांना देवस्थानचे वतीने खिचडी वाटप, पिण्यासाठी ऍक्वागार्डचे पाणी, स्वकाम सेवा मंडळ व इतर सामाजिक संस्थांचे पाणीवाटप, मंदीर स्वच्छता, देणगी पावत्या फाडणे आदी स्वच्छतेची कामे सुरळीत रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे स्वकाम सेवा मंडळाचे अध्यक्ष सुनिल तापकीर यांनी सांगितले.

आळंदीच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, संगिता जठार, अलका काळे, संदेश नवले, महादेव पाखरे आदींनी माऊलींच्या संजीवन समाधीचे वरुथिनी एकादशीचे औचित्य साधत मनोभावे दर्शन घेतले. वाढती गर्दी लक्षात घेऊन नवीन दर्शनबारी भाविकांसाठी सकाळी नऊ वाजल्यापासून खुली करण्यात आली.

एकीकडे भाविकांना मंदिराच्या आवारात सुलभ दर्शनाचा लाभ घेता येत होता, मात्र मंदिराला चोहोबाजूने व्यापारी वर्गासह वाहन चालकांनी देखील वेढा घातल्याने बाहेरील व कोंदट वातावरणामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली. त्यातच दुपारी 12 ते 3 या काळात वीज गेल्याने उकाड्याचा प्रचंड त्रास झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.