पुणे – शेतकरी कुटुंबाला अपघात विम्याचे 2 लाख द्या

ग्राहक मंचाचा विमा कंपनीला आदेश

पुणे – वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे कारण दाखवत अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचा क्‍लेम नाकारणाऱ्या विमा कंपनीला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. अपघात नुकसानभरपाई 2 लाख रुपये 25 ऑगस्ट 2016 पासून वार्षिक 7 टक्‍के व्याजाने आणि नुकसान भरपाई, तक्रार अर्जाचा खर्च म्हणून 25 हजार रुपये देण्यात यावेत, असे अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने आदेशात म्हटले आहे.

याबाबत सुनीता गोरख चव्हाण (ता. कुसेगाव, जि. दौंड) यांनी 7 फेब्रुवारी 2018 रोजी नॅशनल इन्श्‍युरन्स कंपनी लि., मार्फत व्यवस्थापक, शिवाजीनगर आणि तालुका कृषी अधिकारी दौंड यांच्याविरोधात ग्राहक मंचात तक्रार दाखल केली होती. शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाईची मागणी या तक्रारीत करण्यात आली होती. तक्रारदारांचे पती गोरख तुकाराम चव्हाण हे 25 ऑगस्ट 2016 रोजी दुचाकीने प्रवास करत होते. त्यावेळी ते उंडवडी रस्त्यावर मृत आवस्थेत आढळून आले. त्यांच्या शेजारी दुचाकी पडलेली होती. त्यामुळे सुनिता यांनी तलाठ्यांकडे आवश्‍यक कागदपत्रांसह विम्याचा दावा दाखल केला. मात्र, हा क्‍लेम नाकारण्यात आला. त्यामुळे त्यांनी ग्राहक मंचात धाव घेतली. तेथे विम्याच्या दाव्याची रक्कम आणि नुकसान भरपाईची मागणी केली.

विमा कंपनीच्या वतीने या मागणीस ग्राहक मंचात विरोध करण्यात आला. विम्याच्या अटीनुसार गाडी चालविणाऱ्याकडे वाहन परवाना असणे आवश्‍यक आहे. मात्र, तो नसल्याने ते विमा मिळण्यास पात्र नसल्याचे म्हणणे कंपनीने मांडले. तर नोटीस पाठवून कृषी अधिकारी कार्यालयातून कोणीही सुनावणीस हजर राहिले नाही. पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या जबाबानुसार गोरख यांची गाडी पुलावरून पडलेली दिसली. बाजूला ते मयत अवस्थेत होते. त्यामुळे ते स्वत:च्या चुकीने अपघातात मयत झाले अथवा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पुलाखाली पडून त्यांचा मृत्यू झाला, याचा खुलासा होत नाही. त्याचबरोबर अपघात झाला त्यावेळी ते स्वत: गाडी चालवित होते, हे सिद्ध होत नाही. याबाबत कोणताही ठोस पुरावा मंचासमोर आलेला नाही. त्यामुळे क्‍लेम फेटाळणे अयोग्य ठरते, असा निष्कर्ष काढत मंचाने वरील आदेश दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)