पिंपरी – बदलीसाठी पात्र ठरणार्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांमधील अधिकारी व कर्मचार्यांच्या नावाची माहिती संकलित करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने केल्या जाणार्या नियतकालिक बदल्यांबाबत कोणताही प्रस्ताव अथवा पत्रव्यवहार विभागप्रमुखांनी प्रशासनाशी करू नये, अशी तंबी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे. असा पत्रव्यवहार दप्तरी दाखल करण्याचा इशारा काढलेल्या परिपत्रकातून दिला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील विविध विभागांमध्ये वर्ग अ ते ड मधील सुमारे सात हजारपेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. 13 फेब्रुवारी 2015 च्या पत्रकानुसार महापालिका प्रशासनाने कर्मचारी बदलाचे धोरण स्वीकारले आहे. या धोरणानुसार प्रशासकीय कामकाजाच्या सोयीकरिता पात्र ठरणार्या अधिकारी व कर्मचार्यांच्या नियतकालीक बदल्या दरवर्षी एप्रिल व मे महिन्यामध्ये केल्या जातात.
दरम्यान, अनेक पात्र कर्मचार्यांच्या बदल्या झाल्यानंतरही ते नवीन नेमणुकीच्या ठिकाणी रुजू होत नाहीत. अनेक कर्मचार्यांची बदलीपात्र सेवा झाली नसतानादेखील त्यांच्याकडून बदलीसाठी प्रशासनाला अर्ज प्राप्त होतात. तर वर्षभरात कोणत्याही वेळी कर्मचार्यांकडून सामान्य प्रशासन विभागाला बदलीचे अर्ज प्राप्त होत असल्याची बाब आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या निदर्शनास आलेली आहे. याशिवाय विभागप्रमुखांमार्फतदेखील बदल्यांसाठी वारंवार प्रस्ताव सादर केला जात आहे. या बाबींमुळे प्रशासकीय कामकाजावर विपरित परिणाम होत आहे. तसेच बदली धोरणाची अंमलबजावणी करताना ही बाब अडचणीची ठरत आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिलेल्या आदेशानुसार, कोणत्याही विभाग्रमुखांनी बदल्यांचे प्रस्ताव प्रशासनकाडे सादर करू नयेत. अधिकारि व कर्मचार्यांनीदेखील परस्पर बदलीसंदर्भात पत्रव्यवहार करू नयेत. कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्या जातील, असे या कार्यालयीन आदेशात नमूद केले आहे.
बदली धोरणाची अंमलबजावणी आवश्यक
महापालिका प्रशासनाकडून बदली धोरणानुसार अधिकारी व कर्मचार्यांच्या होणार्या बदल्यांमुळे अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत राहत नाहीत. त्यामुळे हितसंबंध निर्माण होणे, नागरिकांशी अथवा वरिष्ठांशी गैरवर्तन करणे अशा बाबींना आळा बसत आहे. त्यामुळे हे बदली धोरण पूरक आहे. मात्र. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे.