सातारा – येथील जनता सहकारी बँकेच्या मोफत अभ्यासिका, मार्गदर्शन केंद्राचे दोन विद्यार्थी शासनाच्या नुकत्याच झालेल्या सरळ सेवा परीक्षेत उत्तीर्ण झाले असून त्यांना तलाठी या पदावर नियुक्ती आदेश प्राप्त झाला आहे.
ही बँक बँकींग व्यवसायाबरोबरच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असून त्याचाच एक भाग म्हणून सहा महिन्यांपूर्वी बँकेचे भागधारक पॅनेलप्रमुख व ज्येष्ठ संचालक विनोद कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून, संचालक मंडळ सदस्य, जनता बँक कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बँकेच्या मंगळवार पेठ शाखेत मोफत अभ्यासिका, मार्गदर्शन केंद्र सुरु केले.
केंद्राच्या सरळ सेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दोन्ही विद्यार्थ्यांचा बँकेच्या संचालक मंडळ व कर्मचारी संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. तलाठी परीक्षेत उत्तीर्ण झालेले तन्मय दशरथ चिकणे (सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी ), तेजस्विनी दिलीप भुते (सातारा जिल्हा तलाठी) यांचे विनोद कुलकर्णी यांनी अभिनंदन केले. बँकेच्या अभ्यासिका सुरू करण्याच्या उद्देशाची यशस्वी सुरूवात झाली असून विद्यार्थ्यांच्या या यशात जनता बँक अभ्यासिकेचा खारीचा वाटा आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले. अभ्यासिकेतील इतर विद्यार्थ्यांनी यातून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त चिकाटीने अभ्यास करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवावे, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.
नजीकच्या काळात आयएएस/ आयपीएस अधिकारी यांचे नियमितपणे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चेअरमन अमोल मोहिते, ज्येष्ठ संचालक आनंदराव कणसे, संचालिका डॉ. चेतना माजगांवकर यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, शाल व पेढे देऊन सत्कार करण्यात आला. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार यांनी प्रास्ताविक केले. तन्मय चिकणे, तेजस्विनी भुते यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक, अभ्यासिकेतील विद्यार्थी, बँकेचे संचालक चंद्रशेखर घोडके (सराफ), वजीर नदाफ, नारायण लोहार, ॲड. चंद्रकांत बेबले, सेवक संचालक अन्वर सय्यद, अभिजित साळुंखे, कर्मचारी संघाचे अध्यक्ष उमेश साठे, प्रशासन अधिकारी महेंद्र पुराणिक, अभ्यासिकेचे नियमित देखरेख ठेवणारे अधिकारी अमितकुमार कणसे, इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.