प्रवरेवरील पुलाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात!
स्थानिकांकडून काम उच्च दर्जाचे व्हावे ही अपेक्षा
कोल्हार – आंतरराष्ट्रीय दर्जाची धार्मिक स्थळे असणारे शिर्डी आणि शिंगणापूर यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला राहुरी आणि श्रीरामपूर तालुक्याला छेदणारा प्रवरा नदीवरील नवीन पूल हा गेल्या दोन महिन्यांपासून खड्ड्यांनी व्यापलेला होता. त्यामुळे अवजड वाहतुकीला नेहमीच अडथळा होत होता. मात्र, काल (शुक्रवार) मध्यरात्रीपासून या पुलाच्या दुरुस्तीला सुरुवात झाली असून, निदान आता तरी या पुलाची दुरुस्ती उच्च दर्जाची व्हावी, अशी अपेक्षा स्थानिकांमधून व्यक्त होत आहे.
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथून वाहणाऱ्या प्रवरा नदीवरील नवीन पूल गेल्या अनेक महिन्यांपासून खड्ड्यांनी व्यापलेला होता. जोडाच्या जागेवर मोठ्या चिरा या पुलावर पडलेल्या होत्या. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी गुडघाभर खड्डे पडल्याने या पुलावरून अवजड वाहतूक करणे धोक्याचे ठरत होते. त्यातच भर म्हणून ऊस वाहतूक करणारे ट्रेलर यावरून सुरू झाल्यावर मात्र वाहतूक नेहमीच या पुलावर दोन्हीही बाजूने खोळंबत होती. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, स्थानिक पादचारी, दुचाकीस्वारांना या पुलावरून नेहमीच जीवघेणा प्रवास करावा लागत होता.
पुलावरून जाताना अनेक छोटे-मोठे अपघात नेहमीच घडत होते. त्याचप्रमाणे अनेक रुग्णवाहिकादेखील पुलावर होत असलेल्या वाहतुकीत अडकून पडल्याचेदेखील अनेकदा पाहायला मिळाले. त्यातच याचा मोठा त्रास स्थानिक नागरिकांना होत होता. त्यामुळे या पुलाची तत्काळ दुरुस्ती व्हावी अशी अपेक्षा स्थानिकांमधून व्यक्त होत होत्या.
मोठ्या कालावधीनंतर अखेर काल (शुक्रवार) मध्यरात्रीपासून या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरवात झाली आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी मारलेला डांबराचा थर काढण्याचे काम सुरू झाले आहे. पुढील तीन दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे ध्येय समोर ठेवून पुलाच्या कामाला सुरुवात झाली असून, तीन दिवसांत पूर्ण होणारे हे काम उच्च दर्जाचे व्हावे आणि दीर्घकाळ टिकावे, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
Remarks :
प्रवरेवरील पुलाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात