- म्युनिसिपल परफॉरमेन्स इंडेक्स
पिंपरी – भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विभाग मंत्रालयाच्या वतीने म्युनिसिपल परफॉरमेन्स इंडेक्स (महापालिका प्रशासकीय कामगिरी) व राहण्यायोग्य शहर सर्वेक्षण 2020 स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये म्युनिसिपल परफॉरमेन्स इंडेक्स 2020 मध्ये पिंपरी चिंचवड शहराने राज्यात प्रथम तर देशपातळीवर चौथे स्थान पटकावले आहे. तर राहण्यायोग्य शहराच्या क्रमवारीतही सुधारणा झाली असून शहराने देशाच्या टॉप 20 यादीत प्रवेश करत 16वे स्थान पटकावले आहे.
इझ ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2020 आणि म्युनिसिपल परफॉरमेन्स इंडेक्स 2020च्या क्रमवारीची घोषणा आज केंद्राच्या वतीने करण्यात आली. सन 2020 मध्ये झालेल्या या सर्वेक्षणासाठी राहण्यास योग्य शहर, महापालिकेचे कामकाज व शहराचे हवामान हे तीन निकष निश्चित करण्यात आले होते. याबाबत नागरिकांची मते जाणून घेऊन सहभागी शहराचा क्रमांक निश्चित करण्यात येणार होता. या सर्वेक्षणामध्ये पिंपरी चिंचवड शहरासह देशातील 114 व राज्यातील 12 शहरांचा सहभाग होता. ऑनलाइन आणि ऑफलाइन सर्वेक्षणाच्या माध्यमातून नागरिकांनी शहराबद्दलची आपली मते थेट यामध्ये नोंदविली. पिंपरी चिंचवड शहरातील 55 हजारांहून अधिक नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदविला होता.