लुधियाना – पंजाबमधील लुधियाना विमानतळ उडवण्याची तसेच 24 तासांत चार विमानांत बॉम्ब ठेवण्याची धमकी दिली गेल्यामुळे खळबळ उडाली असून सुरक्षा सतर्क करण्यात आली आहे. विमानतळ व्यवस्थापकाला अज्ञात व्यक्तीचा हा धमकीचा फोन आला. ही धमकी कोणी दिली याचा अद्याप शोध लागलेला नाही. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी विमानतळावरील सहाय्यक व्यवस्थापकाला फोनवरून ही धमकी देण्यात आली होती.
धमकी मिळाल्यानंतर लगेचच विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आणि प्रत्येक संशयितावर नजर ठेवण्यात आली. असिस्टंट मॅनेजर पवन कुमार यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, 18 फेब्रुवारीला ते विमानतळावर ड्युटीवर होते. त्याच वेळी त्यांच्या मोबाइलवर कॉल आला. मी नवदीप ऊर्फ नवी बोलतोय. येत्या 24 तासांत चार विमानांमध्ये बॉम्ब ठेवण्यात येणार आहेत. तुम्ही वाचवू शकत असलात तर वाचवा. त्याचबरोबर विमानतळही उडवण्याची धमकी देण्यात आली होती असे त्यांनी सांगितले.
पवन यांच्या म्हणण्यानुसार, ते कोणत्याही नवदीपला ओळखत नाही. फोन मिळाल्यानंतर पवन यांनी पोलिसांना त्याबद्दल माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी विमानतळाची सुरक्षा कडक केली आणि तपास सुरू केला. आता दोन आठवड्यांनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.