नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आता गोव्याच्या सत्तेचे डोहाळे लागले आहेत. गोवावासीयांना आकर्षित करण्यासाठी केजरीवाल यांनी दिल्लीत कोकणी अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपच्या सरकारला गोव्याच्या सिंहासनावरून खाली ओढण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कंबर कसून तयार आहेत. गोवा विधानसभेची निवडणूक पुढल्या वर्षी होणार आहे. हे खरं असलं तरी, आम आदमी पक्षाला गोवा आतापासून खुणावू लागला आहे.
गोवावासीयांना आकर्षित करण्यासाठी केजरीवाल यांनी दिल्लीत कोकणी अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणी आणि कोकणच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी हे पाउल उचलण्यात आले असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. यावर दिल्ली मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वीच शिक्कामोर्तब केले आहे.
उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या कला, संस्कृती आणि भाषा मंत्रालयाच्या अंतर्गत कोकणी अकादमी स्थापन केली जाणार आहे. कोकणची समृध्द संस्कृती, भाषा, साहित्य आणि लोककलेचा अनुभव दिल्लीकरांना घेता येईल, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.
कोंकणी अकादमी स्थापन करण्यासाठी सरकार लवकरच सुसज्ज ऑफिस आणि अकादमीसाठी जागा दिली जाणार आहे. दिल्ली सरकारच्या संस्कृती, कला आणि भाषा विभागाने 2019 मध्ये एकूण 14 भाषा अकादमींची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता. देशाची राजधानी असल्यामुळे दिल्लीत सर्व राज्यांतील जनता येथे वास्तव्याला आहे. अकादमी स्थापनेचा हेतू केवळ त्या राज्यांतील लोकांना सामावून घेण्यासाठी नसून सर्वांना देशातील संस्कृतीची ओळख करून देणे हा आहे.
सिसोदिया म्हणाले की, दिल्लीत राहणाऱ्या सर्व भाषिकांना त्यांच्या भाषा आणि संस्कृतीचा सन्मान करून त्यांच्या मनात आपुलकी आणि आत्मियतेची भावना निर्माण करणे दिल्ली सरकारचे कर्तव्य आहे. कोकणी भाषा भारताच्या संस्कृतीचा खूप महत्वाचा आणि रोमांचक अंग आहे. दिल्लीवासीयांच्या मनात गोव्याच्या संस्कृतीचं खास स्थान आहे. यामुळे ही अकादमी कोकणी संस्कृतीला पुढे आणण्याचे काम करेल, असे सिसोदिया यांनी म्हटले आहे.
एवढेच नव्हे तर, कोकणी भाषेची गोडी लावण्यासाठी विविध पुरस्कार आणि पाठ्यक्रम सुरू केले जाणार आहे. याशिवाय कोंकणी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजनही केले जाणार असल्याचेही सिसोदिया यांनी म्हटले आहे.