पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – भोसरीमधील पेठ क्रमांक 12 येथे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणच्या (पीसीएनटीडीए) वतीने आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटासाठी टोलेजंग गृह प्रकल्प विकसीत करण्यात आला आहे. तत्कालीन प्राधिकरण प्रशासनाने 52 हेक्टर क्षेत्रापैकी 9.43 हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प उभारला असून 11 माळ्याच्या एकूण 45 सुसज्ज इमारती बांधण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिक घेण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे 716 सदनिका धुळखात पडल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड ही उद्योगनगरी असून याठिकाणी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो. लाखो कामगार दरमहा 12 ते 15 हजार रुपये वेतनावर काम करतात. त्यामुळे त्यांचे घर घेण्याचे स्वप्न अधुरे राहत असते. अशा कामगारांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवास योजना सरु केली. तत्कालीन पीसीएनटीडीए प्रशासनाने आवास योजनेंतर्गत भोसरीतील पेठ क्रमांक 12 येथे 52 हेक्टर क्षेत्रापैकी 9.43 हेक्टर क्षेत्रावर 11 मजल्याच्या एकूण 45 इमारती बांधल्या. आर्थिक दुर्बल घटकासाठी 29.55 चौरस मीटर चटई क्षेत्राच्या 3317 सदनिका आणि अल्प उत्पन्न गटासाठी 59.27 चौरस मीटर चटई क्षेत्राच्या 1566 सदनिका बांधल्या. त्यामध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, दिव्यांग नागरिकांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले.
आर्थिक दुर्बल घटकासाठी बांधण्यात आलेल्या 3317 सदनिका आणि अल्प उत्पन्न गटासाठीच्या 1566 सदनिका आरक्षीत करण्यासाठी प्राधिकरणाकडून अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. आर्थिक दुर्बल घटकासाठीच्या 3317 सदनिकांसाठी हजारो आर्ज प्राप्त झाले. त्यातून छाननी करून पात्र लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा देण्यात आला. या गटासाठीच्या सर्व सदनिका विक्री करण्यात प्रशासनाला यश आले. तर, अल्प उत्पन्न गटासाठी बांधण्यात आलेल्या 1566 सदनिकांसाठी म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, पीसीएनटीडीए ही आस्थापना पीएमआरडीएमध्ये विलीन केल्यानंतर पुन्हा अल्प उत्पन्न गटातील सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली. त्यावर 1566 पैकी 850 सदनिका विकल्या गेल्या आहेत. उर्वरीत 716 सदनिकांसाठी अर्ज करण्यास नागरिकांमध्ये उदासिनता असल्याचे
चित्र आहे.
घरासाठीच्या अटी-शर्ती व किंमतीत विसंगती
पेठ क्रमांक 12 मधील आर्थिक दुर्बल घटकासाठी 29.55 चौरस मीटर चटई क्षेत्राचे घर (1 बीएचके) घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 3 लाख रुपये अनिवार्य आहे. लाभार्थ्यांना या घरासाठी 7 लाख 40 हजार रुपये किंमत मोजावी लागली. तर, अल्प उत्पन्न गटातील 59.27 चौरस मीटर चटई क्षेत्राचे घर (2 बीएचके) घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 3 ते 6 लाख रुपये निश्चित केली आहे. या घरांची किंमत 32 लाख रुपये ठेवली आहे. नागरिकांनी 2 बीएचके घराच्या किंमतीवर सुरुवातीपासून आक्षेप घेतला आहे. जर, वार्षीक उत्पन्न मर्यादा 3 ते 6 लाखापर्यंत असेल तर पात्रताधारक लाभार्थ्यांना बॅंकेचे कर्ज मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे घराची किंमत आणि अटी-शर्ती यामध्ये विसंगती असल्यामुळे अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांसमोर आडचणी निर्माण झाल्या आहे.
अर्ज करण्यासाठी तीनच दिवसांची मुदत
पेठ क्रमांक 12 मधील आवास योजना प्रकल्पातील आर्थिक दुर्बल घटकासाठीच्या (ईडब्ल्युएस) 3317 सदनिका विकल्या गेल्या आहेत. तर, अल्प उत्पन्न गटासाठीच्या (एलआयजी) 1566 सदनिकांपैकी 850 सदनिका विकण्यात यश आले आहे. उर्वरीत 716 सदनिकांसाठी नागरिकांना अर्ज करण्यास 21 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. हक्काची घरे घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी अर्ज करावेत, असे आवाहन पीएमआरडीएच्या उपजिल्हाअधिकारी मनिषा कुंभार यांनी केले आहे.