पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – स्वच्छ सर्वेक्षण 2022 करिता आपणा सर्वांच्या सहकार्याने आणि सहभागातून महापालिका मार्गक्रमण करीत असून, येत्या काळात महापालिका मानांकनात निश्चितच यशस्वी होईल, असा विश्वास आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने “वर्ल्ड टॉयलेट-डे’ निमित्त चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील कार्यक्रमात स्वच्छ सुरक्षित शौचालय थर्टी डेज या मोहिमेचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.19) पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहशहर अभियंता रामदास तांबे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, सोनम देशमुख, शीतल वाकडे, विजयकुमार थोरात, राजेश आगळे, सिताराम बहुरे, क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
दापोडी येथील सुरेखा दौडमणी म्हणाल्या, कुष्ठरोगी असल्याने कोणी हात लावत नव्हते, परंतु आम्हास महापालिकेने मदतीचा हात देऊन रोजगार उपलब्ध करून दिला. त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत, असे सांगून त्यांनी कृतज्ञतापूर्वक महापालिकेचे आभार मानले. ऐश्वर्या बचत गट महिला बचत गटाच्या राजश्री वैशाली तसेच सावित्रीबाईंना बचत गटाचे अध्यक्ष सरिता गायकवाड यांनी देखील महापालिकेच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल कौतुक केले.या कार्यक्रमात उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या उत्तम थोरात, विनोद वानखेडे, स्वप्निल भंडारे, निलेश आंभोरे, नितीन वाघमारे, प्रशांत जगताप, दीपक शेंडगे या सफाई कर्मचाऱ्यांचा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
बचत गटांना दिले कामाचे आदेश
माय टॉयलेटचे आणि टॉयलेट वरील भिंती चित्राचे अनावरण आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर वर्ल्ड टॉयलेट-डे निमित्त लोकमान्य हॉस्पिटल पासून रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहपर्यंत भव्य पदयात्रा काढण्यात आली. महापालिकेच्या वतीने काही बचत गटांना प्रायोगिक तत्वावर सामुदायिक शौचालय स्वच्छता व देखभाल दुरुस्तीचे कामाचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते देण्यात आले.