पुणे {प्रभात वृत्तसेवा} – पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील १०९ पोलिस चौकीत तब्बल एक हजार सराईत गुन्हेगारांची हजेरी घेण्यात आली. त्यामध्ये मागील पाच वर्षांतील खून, खुनाचा प्रयत्न, तडीपार, मोक्का, स्थानबद्धतेअंतर्गत कारवाई करण्यात आलेले, विविध गुन्ह्यांत जामिनावर बाहेर पडलेल्या सराइतांचा समावेश होता.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पोलिस आयुक्तालयात शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमुख आणि त्यांच्या पंटर लोकांची आयुक्तालयात हजेरी घेतली होती. त्यांना कायद्याशी न खेळण्याचा सल्ला देऊन खास पोलिसी भाषेत दम भरला होता.
त्यानंतर आता आयुक्तांनी आपला झाडाझडती मोर्चा पोलिस चौकीस्तरावर वळविला आहे. पुण्यात प्रभावी पोलिसिंगसाठी चौकी हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे चौक्यांचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून आयुक्तांनी प्रयत्न सुरू केले असून, त्याचाच एक भाग म्हणून पहिल्या दिवशी १०९ पोलीस चौक्यांमध्ये १००० हजार गुन्हेगारांना बोलवून पोलिसी भाषेत समज दिली आहे.
त्यांच्याकडून डोजिअर फॉर्म भरून घेण्यात आले आहेत. त्याद्वारे सराइतांच्या हालचालींवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जाते आहे. दरम्यान, मागील काही दिवसांत शहरात सलग गोळीबाराच्या घटना घडल्या. त्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू देखील झाला. त्या पार्श्वभूमीवर आता नव्या स्टाइलमध्ये गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
त्याअनुषंगानेच गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली मागील पाच वर्षांत गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची पोलिस चौकीत परेड घेण्यात आली. या वेळी गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी चौकीस्तरावर हजर होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दहशत माजविण्यासाठी वाहने फोडणार्या टोळक्यांवर या वेळी पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. अपर पोलिस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे यांनी याबाबत मार्गदर्शन केले.
पोलिस चौकी सक्षमीकरणासाठी आमचे प्राधान्य आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील पोलिस चौकीत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. सर्व प्रभारी अधिकार्यांना याबाबत टार्गेट देण्यात आले आहे. चौकीत येणार्या प्रत्येक तक्रारदाराच्या समस्यांचे निराकरण झाले पाहिजे, हे आमच्या पोलिसिंगचे उद्धिष्ट आहे. – अमितेश कुमार पोलिस आयुक्त पुणे शहर