पिंपरीत करोनाने ओलांडला 65 हजारांचा टप्पा

दिवसभरात 997 जणांना लागण; 16 जणांचा मृत्यू

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोना बाधितांच्या संख्येत मोठी भर पडत असून आज बाधितांच्या संख्येने 65 हजारांचा टप्पा ओलांडला. आज दिवसभरात तब्बल 997 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले असून दिवसभरात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 65 हजार 379 वर पोहोचली आहे. मृतांची संख्या 1369 इतकी झाली आहे.

सोमवारी प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (मंगळवारी) महापालिकेला प्राप्त झाला. मंगळवारच्या अहवालानुसार शहरातील 997 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर गेल्या 24 तासांत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 9 जण शहरातील असून 7 जण शहराबाहेरील आहेत. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 1065 वर पोहोचला असून शहराबाहेरील 304 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूच्या आकड्याने 1369 ची संख्या आज गाठली.

आतापर्यंत शहरातील 54 हजार 779 जण करोनामुक्त झाले असून शहराबाहेरील 3269 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 1188 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या दोन दिवसांतील 2498 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयित असलेले 3854 जण महापालिकेच्या रुग्णांलयांमध्ये दाखल झाले आहेत. तर शहरातील 6407 आणि शहराबाहेरील 1195 जणांवर पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये तसेच कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.