“कॉंग्रेसचे अपयश दडवण्यासाठी खोट्या कारणांचा आधार”

आपचा राहुल गांधींवर पलटवार

नवी दिल्ली -केंद्रातील यूपीए सरकार पाडण्यासाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इंडिया अगेन्स्ट करप्शन आंदोलनाला पाठिंबा दिला. आम आदमी पक्षाची (आप) स्थापना त्याच अजेंड्याची भाग होती, असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. त्यावरून कॉंग्रेसचे अपयश दडवण्यासाठी खोट्या कारणांचा आधार घेतला जात आहे. आता रडणे थांबवा, असा पलटवार आपकडून करण्यात आला.

आपमधून हकालपट्टी झालेले त्या पक्षाचे एक संस्थापक सदस्य आणि वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांची एक मुलाखत नुकतीच प्रसिद्ध झाली. त्यामध्ये त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील काही वर्षांपूर्वीच्या आंदोलनाला भाजप-संघाचा पाठिंबा असल्याचे सूचित केले. त्याचा संदर्भ घेऊन राहुल यांनी ट्‌विट केले.

आम्हाला ठाऊक असलेल्या बाबीची पुष्टी आपच्या संस्थापक सदस्यानेच केली, असेही त्यांनी म्हटले. त्यावर आपचे नेते संजय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. खरेतर, भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांकडून देशाला कुठला आशेचा किरण दिसत नाही. आज केवळ आपच देशाबद्दल बोलतो आणि जनतेच्या समस्या सोडवतो. भविष्यात आपच देशाची पसंती बनेल, असे सिंह यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.