बळीराजाच्या उत्पन्नावर पावसाचे “पाणी’

खरीप पिके हातातून जाण्याची भीती; मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई/नवी दिल्ली – मध्य आणि पश्‍चिम भारतात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे त्याचा फटका खरीप पिकाला फटका बसण्याची शक्‍यता कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
खरीपाच्या पिकात मुख्यत्वे करून गहु, मका, भात, कापूस, सोयाबिन आणि उसाचे पीक घेतल जाते. यावर्षी चांगला पाऊस होण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी पेरणी मोठ्या प्रमाणात केली. देशाच्या याच पट्ट्यात खरीपाची पिके अधिक प्रमाणात घेतली जातात.

पावसाने जून महिन्यात चांगलाच जोर दिला. 17 टक्के पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक राहिले. मात्र जुलै महिन्यात पावसाने पुन्हा काहीसा ताण दिला. 10 टक्के कमी पावसाची नोंद झाली. ऑगस्टमध्ये पुन्हा जोरदार पाऊस झाला. या महिन्यात 27 टक्के अधिक पाऊस झाला. त्या महिन्यातील अधिकच्या पावसाने काही भागात कापूस, सोयाबिन पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, याचा कोणताही अहवाल हाताशी नसताना सरकारी अधिकारी मात्र फारसे नुकसान झाले नसल्याचे सांगत आहेत.

या महिन्याच्या अखेरीस पिकाची कापणी सुरू होईल. त्या काळातच मुसळधार पावसाची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे. या काळात भूईमूग आणि सोयाबिनची काढणी होईल. त्यामुळे काही काळ पावसाने दडी मारणे आवश्‍यक आहे, असे सॉल्व्हंट एक्‍स्ट्रक्‍टरचे कार्यकारी संचालक बी. व्ही. मेहता यांनी सांगितले. ते म्हणाले, सध्या तरी सोयाबीनचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत 93 लाख टन अधिक होण्याची शक्‍यता आहे.

खान्देश सूत गिरणीचे मालक प्रदीप जैन यांच्या मतानुसार येत्या दोन आठवड्यात कापसाची वेचणी सुरू होईल. त्यामुळे पावसाने विश्रांती घेतली नाही तर त्याचा कापसाची गुणवत्ता आणि उत्पादन अशा दोन्हीवर परिणाम होईल

ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने डाळीच्या उत्पादनावर आधीच परिणाम झाला आहे. या महिन्यात आणखी पाऊस झाल्यास चिंतेत भर पडणार आहे, असे जीएलव्ही ऍग्रोचे संचालक विवेक अग्रवाल यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.