कार्यकर्ते उपोषणाच्या तयारीत : निवडणूक समोर असताना पक्षश्रेष्ठींचे दुर्लक्ष
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहर एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र सत्ता असतानाही पक्ष वाढीसाठी प्रयत्न न करणे, निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलणे यामुळे पिंपरी चिंचवड शहरात आज कॉंग्रेस पक्ष मरगळलेल्या अवस्थेत आहे. आता महापालिकेची निवडणूक अवघ्या सव्वा वर्षांवर आलेली असतानाही पक्षश्रेष्ठी पक्षाच्या बांधणीकडे लक्ष घालत नसल्याने पक्षातील कार्यकर्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कॉंग्रेस पक्षाला शहराध्यक्ष नाही. मुलाखती होऊनही अद्याप नाव निश्चित न झाल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहे.
एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातून कॉंग्रेस नामशेष झाली. पक्षांतर्गत लाथाळ्यांमुळे पालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत कॉंग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाला होता. पालिकेत कॉंग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. मात्र यातून कॉंग्रेस नेतृत्वाने कोणताही धडा घेतलेला दिसून येत नाही.
एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या शहरात आपला एकही नगरसेवक नाही याची खंत कोणत्याही राज्यस्तरावरील नेत्याला वाटली नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस सहभागी आहे. शहराध्यक्ष सचिन साठे यांनी 11 नोव्हेंबर रोजी तडकाफडकी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पालिकेची आगामी निवडणूक पाहता साठे यांच्या राजीनाम्यानंतर पक्षश्रेष्ठींनी तात्काळ लक्ष घालून पक्षाची जबाबदारी भक्कम माणसांकडे देणे अपेक्षित होते.
प्रदेश सरचिटणीस आणि पिंपरी-चिंचवडचे पक्ष निरीक्षक राजेश शर्मा, नाशिक शहराध्यक्ष शरद आहेर यांच्या उपस्थितीमध्ये मुलाखतीचा कार्यक्रम झाला. इच्छुक उमेदवारांनी समर्थकांसह हजेरी लावत मुलाखती दिल्या. मात्र त्याला महिना उलटत आला असतानाही अद्याप शहराध्यक्षपदाचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
या धोरणांमुळे गेल्या चार वर्षात बॅकफूटवर गेलेल्या कॉंग्रेसची अधिकच पीछेहाट होताना दिसत आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीला कसे सामोरे जायचे असा प्रश्न कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे. तर लवकर शहराध्यक्षाची निवड झाली नाही तर कॉंग्रेस कार्यकर्ते उपोषण करण्याच्या तयारीत असल्याचेही सांगितले जात आहे.
पंधरा इच्छुकांनी दिली होती मुलाखत
पिंपरी चिंचवड शहरातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप पांढारकर, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम, ज्येष्ठ कार्यकर्ते संदेश नवले, एनएसयूआयचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे, पिंपरी विधानसभा किसान कॉंग्रेस सभा अध्यक्ष सरिता जामनिक, महापालिका शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे, माजी शहर युवक अध्यक्ष सचिन कोंढरे, असंघटित कामगार कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, अशोक काळभोर, रामचंद्र माने, आबासाहेब खराडे, सुदाम ढोरे, रवी खन्ना यांच्यासह पंधरा इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत.
पक्षश्रेष्ठींकडून दुर्लक्ष होत आहे असे वाटत नाही. ते काही कामांमध्ये व्यस्त असतील. जे कार्यकर्ते उपोषणाला बसणार आहे, त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातले पाहिजे. त्यामुळे त्यांच्याही भावना पक्षश्रेष्ठींना समजेल. वर्षभरावर निवडणूक आली आहे. त्यामुळे नेत्यांनी लक्ष घालून पक्षाला उभारी द्यायची आवश्यकता आहे. आगामी निवडणुकीतून महापालिकेत नगरसेवक जातील यासाठी नेते नक्की प्रयत्न करतील. मी कोणाला अध्यक्ष करावे याबाबत काहीही नाव सुचवले नाही.
– सचिन साठे, माजी शहराध्यक्ष, कॉंग्रेस