नवी दिल्ली – ‘बाबा का ढाबा’च्या मालकाचा युट्यूबवर भावनिक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ते कमालीचे प्रसिद्धि झोतात आले होते. त्यांचा दोन दिवसांपूर्वी आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यात बाबा का ढाबा चे मालक कांता प्रसाद यांना जीवाला धोका असून त्यांना सतत धमकीचे फोन येत असल्याची तक्रार बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांनी दिल्लीतील मालविय पोलीस ठाण्यात दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,कांता प्रसाद यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असून ढाब्यावर देखील काही लोक येऊन त्यांना धमकी देत आहेत. याबाबत त्यांचे वकील प्रेम जोशी यांनी मालवीय नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल करतांना युट्यूबर गौरव वासन यावर संशय घेण्यात आला आहे. त्यामुळे ‘बाबा का ढाबा’ ला प्रसिद्धि झोतात आणणाऱ्या युट्यूबर गौरवच्या पुन्हा अडचणीत वाढ होऊ शकते.
यापूर्वी ही, बाबा का ढाबा चे मालक कांता प्रसाद यांनी युट्यूबर गौरव वासन याने आपली फसवणूक केल्याचा आरोप केला होता. कांता प्रसाद यांचा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना अनेकांनी आर्थिक मदत केली होती. ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही, युट्यूबर गौरव वासन याने आपले पैसे खाल्ले, असा आरोप कांता प्रसाद यांनी केला होता.