पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी साडेतीन महिन्यात पुन्हा अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाचे नव्याने फेरवाटप केले आहे. त्यामुळे आयुक्त सिंह यांना पाच महिन्यानंतरही सूर गवसत नसल्याचे दिसून येत आहे. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्या पदाचा वाद महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट) मध्ये प्रलंबित असताना त्यांच्याकडे महत्वाच्या 16 विभागांची जबाबदारी दिली आहे. जितेंद्र वाघ यांच्याकडे 14 तर उल्हास जगताप यांच्याकडे 12 विभाग देण्यात आले आहेत.
पिंपरी महापालिकेचा “ब” वर्गात समावेश झाल्यामुळे तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे आहेत. प्रतिनियुक्तीवरील दोन आणि स्थानिक अधिकाऱ्यासाठी एक अशी विभागणी आहे. प्रतिनियुक्तीवरील जांभळे, वाघ आणि स्थानिक अधिकाऱ्यांमधून जगताप असे तीन अतिरिक्त आयुक्त आहेत. आयुक्त सिंह यांनी या तीनही अतिरिक्त आयुक्तांना 26 सप्टेंबर 2022 रोजी विभागांचे वाटप केले होते. आयुक्तांनी फक्त साडेतीन महिन्यात अतिरिक्त आयुक्तांच्या विभागांचे मंगळवारी (दि.10) फेरवाटप केले आहे. लेखा, अमृत, स्मार्ट सिटी, जेएनएनयूआरएमचे विशेष प्रकल्प, नगररचना आणि दक्षता व गुणनियंत्रण या सर्व विभागांचे कामकाज आयुक्त स्वतः पाहणार आहेत.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्याकडील विभाग ः उद्यान व वृक्षसंवर्धन, अग्निशमन, शिक्षण, माध्यमिक शिक्षण, स्थापत्य (उद्यान), अतिक्रमण, विद्युत मुख्य कार्यालय, करसंकलन, पाणीपुरवठा व जलनि:सारण, जलशुद्धीकरण केंद्र सेक्टर 23, मध्यवर्ती भांडार, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण, स्थापत्य मुख्य कार्यालय, समाज विकास, सर्व क्षेत्रीय कार्यालये व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारे सर्व विभाग (सार्वजनिक वाचनालय, प्रेक्षागृहांसह) आणि आपत्ती व्यवस्थापन असे 16 विभाग त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत.
अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्याकडे असणारे विभाग ः प्रशासन, माहिती व तंत्रज्ञान, पशू वैद्यकीय (बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय), क्रीडा, स्थापत्य (प्रकल्प), वैद्यकीय मुख्य कार्यालय, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, आरोग्य, आकाशचिन्ह व परवाना विभाग, निवडणूक व जनगणना, भूमि आणि जिंदगी, पर्यावरण अभियांत्रिकी, कायदा आणि बीआरटीएस प्रकल्प अशा 14 विभागाचे कामकाज त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्याकडील विभाग ः सुरक्षा, कार्यशाळा, नगरसचिव, माहिती व जनसंपर्क, झोनिपू, आयटीआय मोरवाडी व कासारवाडी, नागरी सुविधा केंद्र, अभिलेख कक्ष, बीएसयुपी, ईडब्ल्यूएस प्रकल्प, स्थानिक संस्था कर आणि कामगार कल्याण अशा 12 विभागाचे कामकाज जगताप यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
बैठकांचा फेरा काही संपेना
शेखर सिंह हे 18 ऑगस्ट 2022 मध्ये आयुक्त म्हणून रूजू झाले आहेत. सिंह यांना महापालिकेत रुजू होऊन पाच महिने होत आले तरी अद्याप त्यांना छाप पाडता आली नाही. स्मार्ट सिटीसह विविध विभागांच्या बैठकांमध्ये ते अडकले आहेत. तसेच प्रशासकीय राजवटीत धोरणात्मक निर्णय घेण्यास काही मर्यादा आहेत. नगरसेवक असते प्रत्येक महत्वाच्या निर्णयावर सविस्तर चर्चा झाली असती. मात्र, सिंह यांनी महत्वाचे निर्णय प्रशासकीय राजवटीत घेण्याचा धडाका लावला आहे.