मुंबई – आठवड्याभरापूर्वी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे अपघातग्रस्त झाले होते. सध्या मुंडे हे मुंबईतील ब्रिज कॅन्डी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे समजते. यावेळी मुंडे भाऊ बहिणीमध्ये बरच वेळ संवाद देखील झाला.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच मतदार संघातील प्रतिस्पर्धी, शिवाय नात्याने भाऊ बहीण, यामुळे त्यांच्यातील संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. बीड आणि परळीतील विकास कामांवरून दोन्हही नेत्यांमध्ये सतत खडाजंगी देखील होत असते. परंतु हे सर्व राजकीय भाव बाजूला ठेऊन पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची थेट रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
मुंडे भाऊ बहिणींच्या भेटीचे काही फोटो देखील यावेळी समोर आले आहेत. धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबत यावेळी पंकजा मुंडे यांनी चर्चा केल्याचे देखील समजते. मंगळवारी (जाने.३) रोजी रात्रीच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला होता. मुंडेंच्या ऑफिसने सोशल मीडियावरून त्याबाबतची माहिती देखील दिली होती. चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले होते.