पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी बुधवारी आपल्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे दिला. त्यानंतर गुरुवारी शहर कॉंग्रेसच्या पाच प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही आपले राजीनामे प्रदेशाध्यक्षांकडे देऊन नाराजी व्यक्त केली आहे.
राजीनामा देणाऱ्यांमध्ये पिंपरी-चिंचवड शहर महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा गिरीजा कुदळे, कॉंग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव तसेच भोसरी ब्लॉकचे अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, पिंपरी ब्लॉकचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे आणि चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशुराम गुंजाळ यांचा समावेश आहे.
प्रदेशाध्यक्ष थोरात यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात पक्षश्रेष्ठींनी आजपर्यंत शहराला न्याय दिलेला नाही व न्याय देण्याच्या भूमिकेत पक्षश्रेष्ठी दिसत नाहीत. ही बाब वेळोवेळी निदर्शनास आणून देऊनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शहर कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना पसरली आहे. अशी खंत या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा पत्रात व्यक्त केली आहे.
सचिन साठे यांनी आतापर्यंत पक्ष संघटनेत केलेले काम पाहता त्यांना प्रदेश नेतृत्वाने विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांची होती. साठे हे महाविद्यालयीन काळापासून कॉंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन त्यांना पक्षश्रेष्ठींनी या वेळी तरी विधान परिषदेवर संधी द्यायला हवी होती. पक्षश्रेष्ठींनी याकडे लक्ष न दिल्याने आणखी पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.