पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आज (मंगळवारी) सन 2023-24 या अर्थिक वर्षासाठी 7 हजार 127 कोटी 88 लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. यंदाचे अंदाजपत्रक 718 कोटी 68 लाख रूपयांच्या शिलकीचे असून कोणत्याही प्रकारची करवाढ, दरवाढ नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अंदाजपत्रकात नवीन प्रकल्पांचा अभाव असून जुन्यांच योजनांना नव्याने मुलामा देण्यात आला आहे. महापालिकेचे 41 वे तर प्रशासकीय राजवटीतील पहिलेच अंदाजपत्रक आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे 2023-24 या वर्षाचे अंदाजपत्रक मुख्य वित्त व लेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे यांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना मंगळवारी (दि.14) सादर केले. सिंह यांनी अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप यांच्यासह लेखा विभागाचे अधिकारी, विविध विभागाचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.
महापालिकेचे मूळ 5 हजार 298 कोटी 31 लाख व केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या पुरस्कृत योजनेसह 7 हजार 127 कोटी 88 लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. अंदाजपत्रक 718 कोटी 68 लाख रूपयांच्या शिल्लकीचे आहे. 2022-23 या आर्थिक वर्षांत केंद्र व राज्य सरकारच्या योजनांसह 6 हजार 497 कोटी 2 लाखांचे अंदाजपत्रक होते. यंदा अंदाजपत्रकात 631 कोटींची वाढ झाली आहे.
बांधकाम परवाना व करसंकलन विभागाकडून येणाऱ्या उत्पन्नावर महापालिकेचा डोलारा उभा आहे. करोनाच्या महामारीनंतर जनजीवन पूर्वपदावर आले आहे. त्यामुळे बांधकाम परवाना विभागाकडून 950 कोटी तर कर संकलन विभागाकडून 850 कोटी रूपयांचे उत्पन्न गृहित धरण्यात आले आहे. तर वस्तू व सेवा करातून 2 हजार 213 कोटी महापालिकेच्या तिजोरीत जमा होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकामध्ये शहराच्या विकासाच्या दृष्टीने कोणतीही नवीन योजना अथवा ठोस कार्यक्रम हाती घेण्यात आलेली नाही. जुन्याच योजना पूर्ण करणाऱ्यावर भर देण्यात आला आहे.
नवीन प्रकल्पांचा अभाव,
जुन्या योजनांना नव्याने मुलामा
गतवर्षीच्या तुलनेत
631 कोटींची वाढ
718 कोटी 68 लाख
रूपये अंदाजपत्रक
कर संकलनाचा
आकडा शंभर कोटींनी घटला
जुन्याच योजनांना नव्याने मुलामा
महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने 13 मार्च 2022 पासून महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे 2023-24 या आर्थिक वर्षांचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचेच अंदाजपत्रक आहे. अंदाजपत्रकातून शहर विकासाचे धोरण दिसून येत असते. मात्र, यंदाच्या अंदाजपत्रकात तसे काही झाल्याचे दिसून येत नाही. जुन्याच योजनांचा समावेश या अंदाजपत्रकात आहे. अंदाजपत्रकात महापालिकेची नवीन इमारत उभारणे, मोशीत 750 बेडचे रूग्णालय उभारणे, मोशीतच 12 एकर जागेवर स्टेडियम, प्राधिकरणात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय उभारणे, अर्बन स्ट्रीटनुसार पदपथ सुशोभीकरण, पीपीपी तत्वावर कॅन्सर रूग्णालय उभारणे, मुळा, पवना, इंद्रायणी या नद्यांसाठी कर्जरोखे उभारण्याचे नियोजन आहे.