पिंपरी – “पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे’वरील वाहनांच्या वेगासह अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी महामार्ग वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम – आयटीएमएस) दसऱ्याच्या मुहूर्तावर कार्यान्वित होणार आहे. याअंतर्गत 106 ठिकाणी 430 पेक्षा जास्त आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या प्रणालीमुळे अतिवेगाने वाहन चालविणे, मार्गिका तोडणाऱ्या वाहनांवर तत्काळ कारवाई करणे सोपे होणार आहे.
एक्स्प्रेस वेमुळे मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांतील प्रवास वेगवान झाला आहे. परंतु एक्स्प्रेस वेवरील वाढते अपघात हा चिंतेचा विषय ठरला आहे. आरटीओने राबविलेल्या सुरक्षा मोहिमेमुळे पुणे- मुंबई एक्स्प्रेस वेवरील अपघात घटले असले, तरी ते पूर्णपणे थांबले नाहीत. एक्स्प्रेस वे वरील अपघातांमध्ये वाहनांचा भरधाव वेग हे प्रमुख कारण समोर आले आहे. परिणामी वाढत्या वेगामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारने “आयटीएमएस’ प्रणाली कार्यान्वित करण्याबाबत आदेश दिले होते.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक्स्प्रेस वेवर आधुनिक इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम राबवली आहे. ही यंत्रणा बसविण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. यात एक्स्प्रेस वेच्या दोन्ही बाजूंना एकात्मिक ऑप्टिकल फायबरद्वारे कॅमेरे जोडलेले आहेत. दर चार कि. मी. अंतरावर वेग तपासणारी यंत्रणा, मार्गिका जोडली आहे. वेगमर्यादेवर नियंत्रण ठेवणारी विशेष प्रणाली कार्यान्वित केली आहे. एक्स्प्रेस वेवर एकूण 106 ठिकाणी 430 पेक्षा जास्त उच्च गुणवत्तेचे सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.
हे कॅमेरे आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षमतेने सुसज्ज आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये 17 पेक्षा जास्त प्रकारांच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन शोधण्यासाठी डिझाईन केले आहे. याशिवाय या यंत्रणेमुळे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक, बंद रस्ते आणि हवामानाच्या माहितीसह रिअल टाईम अपडेट प्रवाशांना मिळू शकते.
वेग ठरतोय काळाचा घाला
एक्स्प्रेस वेवर 95 टक्के अपघात हे ओव्हर स्पीडिंगमुळे होतात. एक्स्प्रेस वेवर कारसाठी कमाल वेग मर्यादा 100 किलोमीटर प्रति तास आहे. तरीही काही वाहने ताशी 150 किमीपर्यंत जातात. त्यामुळे आतापर्यंत शेकडो प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहेत.
अंतर कमी करण्यासाठी मिसिंग लेनदेखील
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. एकूण 13 किलोमीटरच्या या मिसिंग लिंकमध्ये दोन बोगदे आणि दोन पूल उभारले जात आहेत या मिसिंग लेनमुळे पुणे-मुंबई अंतर पुढील वर्षी 13 किलोमीटरने कमी होणार आहे