पुणे -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा ऑनलाइन निकाल सोमवारी (दि.28) दुपारी 1:00 वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे.
दहावीची पुरवणी लेखी परीक्षा दि. 18 जुलै ते दि. 1 ऑगस्ट व बारावीची पुरवणी लेखी परीक्षा दि. 18 जुलै ते दि. 8 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली होती. राज्यातील अतिवृष्टीमुळे काही पेपरची परीक्षा लांबणीवरही टाकण्यात आली होती. नऊ विभागीय मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट मध्ये याप्रमाणे परीक्षा घेण्यात आल्या. त्यानंतर आता निकाल जाहीर करण्याचा निर्णय राज्य मंडळाकडून घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरुन विषयनिहाय गुणाची माहिती मिळणार असून त्याची प्रिंटही घेता येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
गुण पडताळणीसाठी…
ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी गुणांची गुण पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे मंडळाच्या अधिकृत संकेत स्थळावरून स्वत:च्या किंवा शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत दि. 7 सप्टेंबर पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. याचे शुल्कही ऑनलाइनद्वारे भरावे लागणार आहे. निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ – www.mahresult.nic.in
सलग दोन संधी उपलब्ध…
फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये प्रथम नोंदणी करून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी किंवा गुणसुधार योजनेअंतर्गत परीक्षेस पुन:श्च प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली असून या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षा ही अंतिम संधी असणार आहे. त्यामुळे यापूर्वीचे असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणताही पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी यांना श्रेणीसुधार योजनेअंतर्गत परीक्षेस प्रविष्ट होता येणार नाही.
जुलै-ऑगस्ट 2023च्या परीक्षेमध्ये सर्व विषयांसह प्रथम प्रविष्ट होऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी, गुणसुधार योजनेअंतर्गत परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी तरतूदींच्या अधीन राहून पुढील सलगच्या दोन संधी उपलब्ध होणार आहेत.