पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या शिवाजीनगर ते हिंजवडी या 23 कि.मी. लांबीच्या मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. मेट्रो प्रकल्पासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असताना “रिजनरेटीव्ह ब्रेकिंग सिस्टीम’चा वापर केला जाणार आहे. ज्या-ज्या वेळी मेट्रो ब्रेक लावेल, त्यावेळी घर्षणातून निर्माण होणारी ऊर्जा साठवून घेतली जाईल आणि ती वीज निर्माण करण्यास सक्षम असेल. या ब्रेक दाबण्यातून निर्माण झालेल्या आणि साठवलेल्या विजेचा वापर पुन्हा मेट्रो चलविण्यासाठी करण्यात येणार आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर मेट्रोचे काम “पीएमआरडीए’तर्फे सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर करण्यात येत आहे. या मेट्रो मार्गावर सुमारे 23 स्टेशन असणार आहे. ही मेट्रो “पुणेरी मेट्रो’ म्हणून ओळखली जात आहे. मेट्रोच्या कामकाजामधून होणाऱ्या कार्बन डायऑक्साइडच्या संभाव्य उत्सर्जनामध्ये नियंत्रण राखणे ते कमी करण्याकडे भर दिला जाणार आहे. यासाठीचा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ऊर्जेची पुनर्निर्मिती किंवा फेरवापर करणे. हा फेरवापर शक्य करणारी अत्याधुनिक, अशी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग टेक्नॉलॉजी (आरबीटी) पुणेरी मेट्रोमध्ये वापरण्याची योजना आहे, अशी माहिती पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर यांनी दिली.
रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम म्हणजे काय?
रिजनरेटिव्ह ब्रेकिंग ही एक ऊर्जा पुनर्प्राप्ती यंत्रणा आहे. जी वाहन किंवा वस्तूची गतीशील ऊर्जा, अशा स्वरुपात रुपांतरित करते. ही ऊर्जा एकतर त्वरित वापरली जाऊ शकते किंवा आवश्यकतेपर्यंत साठवता येऊ शकते. मेट्रो ट्रेनच्या प्रक्रियेत जेव्हा ट्रेन ब्रेक लावते तेव्हा गतीज ऊर्जा सोडली जाते आणि ती मोटर्समधील विद्युत प्रवाहात साठवली जाते. मेट्रो ट्रेनच्या बॅटरीमध्ये वितरीत होणारी अशी वीज इलक्ट्रिक जनरेटर म्हणून देखील कार्य करते. ही एक ऊर्जा-बचत प्रक्रिया असते कारण पुन्हा निर्माण केलेली विद्युत ऊर्जा त्याच ट्रेनला किंवा मार्गावरील इतर मेट्रो गाड्यांना वापरता येऊ शकते.
मेट्रोचे ब्रेकिंग सिस्टीम अशी काम करेल…
मेट्रोच्या प्रत्येक बोगी अथवा डब्यामध्ये इलक्ट्रिक ब्रेकिंग तसेच इलेक्ट्रो-न्यूमॅटिक ब्रेकिंग सिस्टिम असेल. तिचा वापर करून या ट्रेनच्या मोटर्स ब्रेक कम पॉवर जनरेटर म्हणून काम करतील. नेहमीच्या वेगाने ट्रेनला इलक्ट्रिक ब्रेकिंग लागू होईल. मात्र, जेव्हा ट्रेनचा वेग ताशी 10 कि.मी. किंवा त्याहून कमी होईल तेव्हा इलेक्ट्रो-न्यूमॅटिक ब्रेकिंग सिस्टिम लागू केली जाईल. या मेट्रोच्या प्रत्येक बोगीमध्ये असे दोन स्वतंत्र इलेक्ट्रो-न्यूमॅटिक सर्किट्स असतील. इलेक्ट्रो-न्यूमॅटिक मॉड्यूलमध्ये ब्रेक सक्रियकरण उपकरणे असतील, ज्यामध्ये दाब निर्मिती, दाब नियमन आणि इलक्ट्रिक ब्रेक नियंत्रण यांचा समावेश असेल.