एकूण बाधित 1373 : “करोना’मुळे एका महिलेचा मृत्यू
पिंपरी – गेल्या 24 तासात आणखी 49 जणांना “करोना’ची लागण झाली आहे. यापैकी 46 रुग्ण शहरातील रहिवासी आणि तीन रुग्ण हे शहराबाहेरील आहेत, परंतु शहरात उपचार घेत आहेत. शहरातील 46 रुग्ण वाढल्यामुळे आतापर्यंतच्या एकूण “करोनाबाधितां’चा आकडा 1373 वर जाऊन पोहचला आहे. तर मोशी येथील एका ज्येष्ठ नागरिक महिलेचा “करोना’मुळे मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील 24 रुग्णांचा “करोना’ने मृत्यू झाला आहे.
बुधवारी महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार शहरातील 43 रुग्णांमध्ये 28 पुरुष आणि 15 स्त्रिया आहेत. महापालिकेने आतापर्यंत 11335 संशयितांचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी 9668 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर अद्यापही 475 अहवाल प्रलंबित आहेत. सध्या महापालिकेच्या रुग्णालयात 513 “करोनाबाधित’ रुग्ण उपचार घेत आहेत.
तर 40 शहराबाहेरील रुग्णही उपचार घेत आहेत. बुधवारी 38 “करोनाबाधित’ रुग्णांना उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे “करोनामुक्त’ रुग्णांची संख्या 829 झाली आहे. बुधवारी “करोना’ अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण शिंदेनगर जुनी सांगवी, यमुनानगर निगडी, पंचतारानगर आकुर्डी, विशाल ई स्क्वेअरजवळ पिंपरी, क्रांतीनगर आकुर्डी, संत तुकारामनगर भोसरी, विठ्ठलनगर नेहरुनगर, शास्त्रीनगर पिंपरी, रमाबाईनगर पिंपरी, साईबाबानगर चिंचवड, वाल्हेकरवाडी, वैभवनगर पिंपरी, आनंदनगर पिंपळे गुरव, गुलाबनगर दापोडी, कुदळवाडी, कासारवाडी, शिवशाहीनगर दिघी, तालेरानगर चिंचवड, पिंपरी, पिंपळे सौदागर, बौद्धनगर पिंपरी, वडगावशेरी, म्हाळुंगे, खेड, देहूरोड, येरवडा, आंबेगाव, कोथरुड येथील रहिवासी आहेत.