शिरवळ – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा लोकसभा मतदारसंघात संघटनात्मक बांधणीसाठी लोकसभा प्रवास योजना 2 अंतर्गत आलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांचे शिरवळ येथे भारतीय जनता पार्टीच्यावतीने मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर ना. मिश्रा यांनी नायगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मघराला भेट देऊन, महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी त्यांनी फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत केंद्र स्तरावर पाठपुरावा करण्याबाबत त्यांनी सकारात्मकता दर्शविली.
लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत ना. मिश्रा यांचे आज दुपारी पुणे विमानतळावर आगमन झाले. याठिकाणी सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर शिरवळ येथे ना. मिश्रा हे डॉ. भोसले यांच्यासमवेत पोहचले असता तिथे माजी आमदार मदन भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर ना. मिश्रा यांनी नायगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मघराला भेट दिली आणि महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी त्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टीलाही भेट दिली.
याठिकाणी झालेल्या समारंभात बोलताना ना. मिश्रा यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण व आरोग्यविषयक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत, त्यांच्या महान कार्याला सलाम केला. ते म्हणाले, लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी भाजप कार्यरत आहे. सत्तेला आम्ही सेवेचे माध्यम मानतो. आज राज्यात व देशात भाजपचे सरकार आहे. भाजपा सरकारच्या माध्यमातून विकासाची गंगा तळागाळापर्यंत पोहचविण्यात यश आल्याने, येत्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रचंड बहुमताने जिंकेल. तसेच महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघात भाजप व मित्रपक्षांचे उमेदवार नक्की निवडून येतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी डॉ. अतुल भोसले, मदन भोसले, सरपंच सौ. साधना नेवसे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. सुरभी भोसले, शेखर वढणे, अनिरुद्ध गाडवे, गणेश नेवसे, अविनाश वाडकर, कोमल नेवसे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, मंगळवार दि. 17 रोजी सकाळी 9 वाजता कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसमध्ये ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. 10 वाजता चाफळ येथील श्रीराम मंदिराला भेट, चाफळ येथे मधन्यवाद मोदीजीफ कार्यक्रमास उपस्थिती, 11.30 वाजता उंब्रज येथे दुर्बल घटकांसोबत चर्चा, कोरेगावमध्ये दुपारी 1 वाजता लाभार्थी मेळावा, संघटनात्मक जिल्हा बैठक व 3 वाजता सोशल मीडिया, आयटी सेल व लीगल सेलची बैठक, सातारा येथे 4 वाजता कोअर टीम व लोकसभा प्रवास समिती बैठक, 4.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यलय येथे जिल्हा प्रशासकीय बैठक, सायंकाळी 5.40 वाजता गणेश मंदिर, जवान्स सोसायटी, सदरबझार येथे बूथ बैठक, सायंकाळी 6.20 वाजता सदरबझार येथील जनऔषधी केंद्रास भेट, यानंतर विचार परिवार बैठक होऊन ना. मिश्रा यांच्या दौऱ्याचा समारोप होणार आहे.