चांद्रयान-3 चे दुसरे आणि अंतिम डी-बूस्टिंग ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी येत्या बुधवारी चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरण्यापूर्वी महत्त्वाच्या टप्प्याचे बारकाईने निरीक्षण केले. लॅंडर विक्रमने स्वतःला अखेरच्या कक्षेत स्थापित केले आहे. या कक्षेतून चंद्राचे सर्वात जवळचे अंतर 25 किमी आहे आणि सर्वात दूरचे अंतर 134 किमी आहे. या कक्षेतूनच बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात सॉफ्ट लॅंडिंगचा प्रयत्न करणार असल्याचे इस्रोने म्हटले आहे. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष 23 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सॉफ्ट लँडिंगकडे लागले आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगसाठी लँडर मॉड्यूल सध्या योग्य जागा शोधत आहे. त्यादरम्यान चंद्राचे अगदी जवळचे फोटो लँडर हॅजार्ड डिटेक्शन अँड अव्हॉईडन्स कॅमेऱ्यानेआपल्या कॅमेऱ्यातून टिपले आहेत. इस्रोने आपल्या ट्विटर हँडलवरुन हे फोटो शेअर केले आहेत. ‘चांद्रयान-3’ने टिपलेले हे फोटो चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील आहेत.
चांद्रयान 3 ने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केल्यास चंद्रावर पोहोचणारा भारत जगातील चौथा देश बनेल. आजवर अमेरिका, रशिया आणि चीनला चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यश मिळाले आहे. एवढेच नाही तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरू शकतो.
Chandrayaan-3 Mission:
Here are the images of
Lunar far side area
captured by the
Lander Hazard Detection and Avoidance Camera (LHDAC).This camera that assists in locating a safe landing area — without boulders or deep trenches — during the descent is developed by ISRO… pic.twitter.com/rwWhrNFhHB
— ISRO (@isro) August 21, 2023
मागील महिन्यात, 14 जुलै रोजी प्रक्षेपित झाल्यानंतर 5 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत दाखल झाले होते. आता 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास विक्रम लँडर हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल. विक्रमला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याचे सर्वात मोठे आव्हान इस्रोच्या टीमसमोर आहे.
या ऐतिहासिक क्षणाकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, 23 ऑगस्ट रोजी रशियाच्या यानाचेही मूनलॅंडींग अपेक्षित होते. मात्र, कक्षा बदलताना त्या यानात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे रशियाची चांंद्र मोहीम अपयशी ठरली.