Petrol Pump: राजस्थानमधील सर्व पेट्रोल पंप पुढील दोन दिवस बुधवार आणि गुरुवारी बंद राहतील. बुधवारी आणि गुरुवारी राज्यातील सर्व पेट्रोल पंप सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत बंद राहणार असल्याचे पेट्रोल पंप चालकांकडून जाहीर करण्यात आले आहे.
पेट्रोल पंप बंद का ठेवणार?
राजस्थान पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र सिंह भाटी म्हणाले की, इंधनावर लादण्यात येत असलेल्या उच्च व्हॅटविरोधात राज्यभर निदर्शने करण्यात येणार आहेत. राज्यभरातील पेट्रोल पंप बुधवार आणि गुरुवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत बंद राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बेमुदत संपाचा इशारा दिला
राजेंद्रसिंह भाटी पुढे म्हणाले की, राजस्थान पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनच्या मागण्या मान्य न झाल्यास १५ सप्टेंबरपासून संपूर्ण राज्यात बेमुदत संप सुरू करण्यात येईल. ते म्हणाले की, राज्यात वाढलेल्या व्हॅटमुळे केवळ पेट्रोल पंपचालकच नाही तर सर्वसामान्य जनताही त्रस्त आहे. व्हॅट कमी करण्याची मागणी आम्ही राज्य सरकारकडे वारंवार करत आहोत मात्र याकडे लक्ष दिले गेले नाही.