कोलकाता – पश्चिम बंगालमधील आंदोलनकर्त्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज थेट केंद्रीय मंत्री सुभाष सरकार (Union Minister Subhash Sarkar) यांना पक्षाच्या कार्यालयामध्येच कोंडले. सुभाष सरकार हे भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीचे निर्णय हुकुमशाही पद्धतीने घेत असल्याचा आरोप भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
सुभाष सरकार हे केंद्र सरकारमध्ये शिक्षण राज्य मंत्री असून पश्चिम बंगालमधील बानकुरा येथून लोकसभेवर निवडून गेले आहेत. मंगळवारी दुपारी ते पक्षाच्या कार्यालयामध्ये एक बैठक घेत होते. त्यावेळी भाजपच्या एका गटाचे कार्यकर्ते पक्षाच्या कार्यालयामध्ये घुसले आणि त्यांनी सुभाष सरकार यांना पक्षाच्या कार्यालयातच कोंडून ठेवले.
सुभाष सरकार हे पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना महत्व देत नाहीत आणि त्यांच्याच निकटवर्तीयांना जिल्हा कार्यकारिणीवर नियुक्त करतात. काही निष्ठावंत कार्यकर्त्यांना सुभाष सरकार यांनी कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे.
यावेळी बानकुरा महापालिकेच्या गेल्या निवडणुकीमध्ये भाजपला दोन वॉर्डांमध्ये विजय मिळाला होता. मात्र आता तर अनेक जागांवर निवडणुकीसाठी उमेदवार देखील मिळू शकले नाहीत. निवडणुकीत काहीही यश मिळाले नाही, याचे कारण सुभाष सरकार यांची हुकुमशाही कार्यपद्धती असल्याचे एका कार्यकर्त्याने सांगितले.
याच दरम्यान भाजपचा आणखीन एक गट तेथे पोचला आणि दोन्ही गटांमध्ये मोठी बाचाबाची झाली. अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलिसांनी सरकार यांची सुटका केली.