नवी दिल्ली : घरगुती बनावटीचा पेट्रोल बॉम्ब फेकणाऱ्याला त्याच्या साथिदारासह पोलिसांनी अटक केली. येथील सीलामपूर भागात मंगळवारी झालेल्या हिंसक निदर्शनात त्याने या बॉम्बचा वापर केला होता, असे पोलिसांनी सांगितले.
देशी बनावटीचा हा पेट्रोल बॉम्ब बनवण्यासाठी फारसे साहित्य लागत नाही. अथवा काही विशेष कौशल्य लागत नाही. जीवाला कोणताही धोका न होता हा बॉम्ब एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे नेता येतो. या आरोपीचे नाव राहीस असे असून त्याचा साथिदार हसन याला अटक केली आहे. हे अरोपी पोलिसांच्या दिशेने खुलेपणाने पेट्रोल बॉम्ब फेकत होते. हा तरूण हातात काही तरी घेऊन पळत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला होता.
सीलामपू आणि जाफराबाद भागात मंगळवारी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात त्याने आपली ओळख लपवण्यासाठी तोंडावर मफलर गुंडाळला आहे. तसेच गॉगल परिधान केला आहे. त्याच्यासोबत अन्य काही युवक पळताना यात दिसत आहेत. या स्फोटात या आरोपींचा हात असल्याचे यात स्पष्टपणे दिसत आहे. या आंदोलनात जखमी झालेले आणि सीलामपूर पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक असणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले, त्याच्या पाठीवरील बॅग काढून तो ठेवतो. स्फोटानंतर त्याच्या हातातून रक्त येत असते. स्थानिक नागरिकांनी त्याला ओळखले असून त्याचे नाव राहीस आहे.
पोलिसांनी या गटने नंतर शोधमोहीम राबवली होती. सरकारी रुग्णालयात उपचार घेत असताना त्याला अटक करण्यात आली. दिल्ली पोलिस त्याच्यावर देशद्रोहाचा गंभीर गुन्हा नोंदवण्याच्या तयारीत आहेत. त्याने त्याच्या काही सहकाऱ्यांची नावे सांगितली असून त्यापैकी दोन जणांना अटक केली आहे.