चंडिगढ -पंजाबमध्ये 80 वर्षीय चांभार तब्बल 20 वी निवडणूक लढवण्यास सज्ज झाला आहे. वाढते वय, पैशांची चणचण आणि 19 निवडणुकांत आलेल्या अपयशाची पर्वा न करता तो ज्येष्ठ उमेदवार केवळ आवड म्हणून पुन्हा रिंगणात उतरला आहे.
पंजाबमधील होशियारपूर विधानसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार दिले आहेत. मात्र, ओमप्रकाश जाखू हे वयोवृद्ध उमेदवार चर्चेचा विषय बनले आहेत. उदरनिर्वाहासाठी ते पादत्राणांच्या दुरूस्तीचे एक छोटेखानी दुकान चालवतात. आता ते पुन्हा निवडणूक लढवण्यास सज्ज झाले आहेत. भारतराष्ट्र डेमोक्रॅटिक पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचे निम्मे आयुष्य म्हणजे जवळपास 40 वर्षे निवडणुका लढवण्यात गेली आहेत.
आमदार किंवा नगरसेवक बनण्यासाठी त्यांनी निवडणुका लढवल्या. त्यामध्ये यश मिळाले नसले तरी मोठ्या अभिमानाने 20 व्या निवडणुकीला सामोरे जात असल्याचे ते सांगतात. निवडणूक रिंगणात उतरण्यास पत्नी आणि मुलांनी नेहमीच पाठिंबा दिला. विजयी झाल्यास मोफत शिक्षण, चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. अंमली पदार्थांची समस्याही सोडवण्याची गरज आहे, अशी भूमिका ते मांडतात.